न्यू यॉर्क : कोरोना व्हायरसने आता अमेरिकेत आक्राळ-विक्राळ रूप धारण केले आहे. न्यू यॉर्कमधील मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. परिणामी, येथे मृतांचा ढीग लागला आहे. यामुळे येथील मृतदेह आता एकसाथ कब्रीत दफन केले जात आहेत. सोशल मिडियावरही याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
अमेरिकेच्या न्यू यॉर्कमध्ये गुरुवारीही 790 हून अधिक लोकांचा कोरोनाने बळी घेतला. याच्या एकदिवस आधी, म्हणजेच बुधवारीही येथे 731 जण कोरोनामुळे दगावले. तर गेल्या शुक्रवारीही येथे 779 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
पाटासारख्या दिसणाऱ्या खड्ड्यांत सुरू आहे दफन -
अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात कोरोनामुळे मरणारांना दफन करण्यासाठी पाटासारख्या दिसणाऱ्या खड्ड्यांची निर्मिती करण्यात येत आहे. हे खड्डे मशीनच्या सहाय्याने तयार कण्यात येत आहेत. एवढेच नाही, तर मृतदेहाचे 'ताबुत'ही मशीनच्या सहाय्यानेच या खड्ड्यांत ठेवले जात आहेत. शहरापासून दूर, या मृतदेहांचे दफन केले जात असून यावेळी केवळ मृतदेह दफन करणारे लोकच दिसत आहेत.
कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेतील न्यू यॉर्क शहराला बसला आहे. येथील मरणारांचा आकडा दिवसागणिक वाढण्याचीही शक्यता आहे. 11 सप्टेंबरच्या (9/11) दहशतवादी हल्ल्यात 2 हजार 753 जणांचा मृत्यू झाला होता. तर कोरोना व्हायरसमुळे एकट्या न्यू यॉर्कमध्येच आतापर्यंत 7 हजार 67 जणांचा मृत्यू झाला आहे, असे न्यूयार्कचे गव्हर्नर अँड्र्यू कुओमो यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले.
सातत्याने वाढतोय मृतांचा आकडा -
अमेरिकेतील आतापर्यंत 16 हजार 500 जमांचा कोरोनाने बळी घेतला आहे. येथे आतापर्यंत जवळपास 4 लाख 62 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे, एकट्या न्यू यॉर्कमध्ये आतापर्यंत 7 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
जगभरात 90 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू -
जगभरात आतापर्यंत 90,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी अर्धे लोक केवळ इटली, स्पेन, अमेरिका आणि फ्रान्समधील आहेत. आतापर्यंत इटलीत सर्वाधीक मृत्यू झाले आहेत. त्या खालोखाल स्पेन आणि नंतर अमेरिकेचा क्रमांक लागतो.