ऑनलाइन लोकमत
कैरो, दि. १६ - इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया या दहशतवादी संघटनेचे क्रूरकृत्य सुरुच असून आता इसिसने लिबीयात अपहरण केलेल्या ख्रिश्चनांचा सामूहिक शिरच्छेदाचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. ज्या समुद्रात ओसामा बिन लादेनला दफन करण्यात आले आहे, त्या समुद्राला तुमच्या रंगाने लाल करु अशी धमकीही या व्हिडीओत देण्यात आली आहे.
लिबीयात कॉप्टीक ख्रिश्चन समुदायातील २१ जणांची अपहरण करण्यात आले होते. हे सर्व जण मूळचे इजिप्तमधील होते. इसिसने रविवारी रात्री उशीरा इंटरनेटवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये अपह्रत ख्रिश्चनांना एका समुद्रकिनारी नेण्यात आले. प्रत्येकासोबत एक दहशतवादी होता. व्हिडीओच्या सुरुवातीला एक व्यक्ती कॅमे-यासमोर धमकी देताना दिसत आहे. धमकी देणारा व्यक्ती हा उत्तर अमेरिकेच्या शैलीत इंग्रजी बोलत असून आम्ही रोमवरही ताबा मिळवू असे त्याने म्हटले आहे. ओसामा बिन लादेनच्या मृत्यूचा बदला घेण्यचाी धमकी दिल्यावर सर्व बंधकांचे शिरच्छेद केले गेले. व्हिडीओत धमकी देणारा व्यक्ती स्वतःला इसिस त्रिपोली या दहशतवादी संघटनेशी संबंधीत असल्याचे सांगतो.
सध्या या व्हिडीओची सत्यता पडताळली जात आहे. इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांनी इजिप्तच्या नागरिकांना लिबीयात जाण्यावर निर्बंध टाकण्याचा निर्णय घेतला असून लिबीयात अडकलेल्या इजिप्तच्या नागरिकांना सुखरुप परत आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.