पृथ्वीच्या कक्षेजवळून शनिवारी (14 सप्टेंबर) रात्री दोन मोठे धुमकेतू जाणार आहेत. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा' ने याबाबत माहिती दिली आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीच्या कक्षेजवळून जाणाऱ्या या धुमकेतूंचा आकार हा जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा इतका मोठा असणार आहे. बुर्ज खलिफाची उंची 828 मीटर आहे त्यामुळे या धुमकेतूंच्या आकाराची कल्पना करता येऊ शकते.
धुमकेतूंमुळे आतापर्यंत पृथ्वीला कोणत्याही प्रकारचा धोका दिसलेला नाही. 2000 QW7 आणि 2010 C01 अशी या विशाल धुमकेतूंची नावं असून ते पृथ्वी आणि चंद्राच्यामधून जाणार असल्याची माहिती नासाने दिली आहे. नासाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ऑर्बिटच्या तपासणीनंतर पृथ्वीवरील धोक्यांविषयी माहिती मिळेल. नासाने 2000 सालापासून या धुमकेतूंवर लक्ष ठेवले होते.
पृथ्वीपासून अंदाजे 3.5 दशलक्ष मैलांवरून हे धुमकेतू जातील असा नासाचा अंदाज आहे. प्रथमच धुमकेतू पृथ्वीच्या इतक्या जवळून जाणार आहेत. नासाच्या मते 2010 C01 धुमकेतू 400 ते 850 फूट असून तो अमेरिकेच्या वेळेनुसार 13 सप्टेंबर आणि भारतीय वेळेनुसार 14 सप्टेंबरच्या रात्री 11 वाजून 42 मिनिटांनी पृथ्वीच्या कक्षेजवळून जाणार आहे. तर 2000 QW7 हा धुमकेतू 950 ते 2100 फुटांचा असून तो भारतीय वेळेनुसार 14 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी पृथ्वीच्या कक्षेजवळून जाणार आहे.