काहिरा : लिबियामध्ये डॅनियल चक्रीवादळानंतर आलेल्या पुराने हाहाकार उडाला असून, यात आतापर्यंत ३ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे १० हजारपेक्षा अधिक लोक बेपत्ता असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
आतापर्यंत केवळ ७०० मृतदेहांची ओळख पटली आहे. बचावकार्यात गुंतलेले १२३ जवानही बेपत्ता आहेत. १२ जवानांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे देशातील अनेक विमानतळेही भूईसपाट झाली असून, येथे मालवाहू विमान उतरले जाऊ शकत नाही. त्यामुळे मदत करण्यास अडचणी येत आहेत. गेल्या १०० वर्षांत असा पूर आला नव्हता, असे सांगण्यात आले.
२५ टक्के शहर वाहून गेले - वादळानंतर प्रचंड पाऊस झाल्याने दोन धरणे फुटली असून, लिबियाच्या पूर्वेकडील र्डेना शहराचा सुमारे एक चतुर्थांश भाग वाहून गेला आाहे.- एकट्या र्डेना शहरात १ हजारपेक्षा अधिक मृतदेह हाती लागले आहेत. येथील ६ हजारपेक्षा अधिकजण बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा १० हजारांवरही जाऊ शकतो. एक लाखाहून अधिक लोक बेपत्ता असण्याची शक्यता आहे. आत्ताच काही ठोस सांगणे कठीण आहे.- अब्दुल जलील, आरोग्य मंत्री
जिकडे तिकडे मृतदेह...- १ लाख २५ हजार नागरिक असलेल्या र्डेना शहरात अनेक वाहने उलटलेली, झाडे कोसळलेली आणि पडझड झालेली घरे दिसत आहेत.- समुद्रात, डोंगरात, इमारतींच्या खाली जिकडे तिकडे मृतदेह पडलेले असल्याचे रॉयटर्सच्या पत्रकाराने म्हटले आहे.