युगांडामध्ये दृष्टिहीन मुलांच्या शाळेला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आगीमध्ये आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर सहा जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
अग्निशमन दलाचे कर्मचारी, पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने वेगाने बचावकार्य सुरू आहे. आगीत अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. एएफपीने दिलेल्या माहितीनुसार, युगांडामधील मुकोनो जिल्ह्यातील दृष्टिहीन मुलांसाठीच्या शाळेला मंगळवारी अचानकपणे आग लागली. या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
जखमींना किसोगा येथील हेरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. ल्यूक ओवोयेसिगिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळांमध्ये अशाप्रकारे आग लागण्याच्या घटना या शिक्षण अधिकाऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. याआधी अनेकदा युगांडामध्ये शाळेला आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"