आखाती देश असलेल्या कुवेतमधील दक्षिणेकडील मंगफ शहरात बुधवारी एका इमारतीला भीषण आग लागली. या दुर्घटनेत ४१ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यात ५ भारतीय नागरिकांचाही समावेश असल्याचे समजते. लागलेली आग एवढी भीषण हेती की, ती काही वेळातच मोठ्या प्रमाणावर पसरली. कुवेतच्या अधिकृत वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
ही आग काही वेळातच संबंधित बहुमंजली इमारतीच्या अनेक मजल्यावर पसरली. या अपघातातील मृत ५ भारतीय केरळमधील आहेत. यासंदर्भात आम्ही चौकशी करत आहोत आणि ही आग कशामुळे लागली हे जाण्याचा प्रयत्न करत आहोत, असे कुवेतच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
ही आग स्थानिक वेळेनुसार ४ वाजण्याच्या सुमारास लागली. यावेळी बहुतांश लोक झोपलेले होते. यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यास उशीर झाला. औद्योगिक प्लांटमध्ये काम करणाऱ्या लोकांना राहण्यासाठी या इमारतीचा वापर केला जातो. मिळालेल्या माहितीनुसार या इमारतीत मोठ्या संख्येने मल्याळम भाषिक लोक राहतात. ही आग एवढी भीषण होती, की भीती पोटी अनेकांनी खिडक्यांमधून खाली उड्या घेतल्या. जीव वाचविण्याच्या या प्रयत्नात अनेकांना दुखापत झाल्याचेही समजते. आतापर्यंत मिळालेल्या माहतीनुसार या घटनेत ४३ लोक जखमी झाले आहेत.
दुखापत झालेल्यांना फायर ब्रिगेड आणि पोलिसांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. यातील काही लोकांना गंभीर दुखापत झाली आहे.