ऑनलाइन लोकमत
ढाका, दि. २७ - बांगलादेशची राजधानी ढाका येथील डिप्लोमॅटिक क्वॉर्टरच्या उपाहारगृहावर दहशतवादी हल्ला करून २० निरपराधांचा बळी घेतल्याची घटना ताजी असतनाच या हल्ल्याच्या मास्टरमाईंडचा पोलिसांच्या चकमकीत खात्मा झाल्याचे वृत्त आहे. ढाका येथे बांगलादेश पोलिसांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. त्यामध्ये ढाका दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तमीम चौधरी याचाही समावेश आहे.
आणखी वाचा :
अनेक परदेशी पर्यटकांचा राबता असणारा ढाक्यातील 'गुलशन' परिसर महत्वपूर्ण मानला जातो. १ जुलै रोजी रात्री ९ च्या सुमारास ८ ते १० दहशतवाद्यांनी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या डिप्लोमॅटिक क्वॉर्टरच्या येथील आर्टिझन बेकरीत घुसून बेछूट गोळीबार करण्यास सुरूवात केली आणि एकच हल्लाकल्लोळ माजला. या हल्ल्यात एका भारतीय नागरिकासह २० जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी दहशतवाद्यांना चोख उत्तर देत गोळीबार केला. सुमारे दोन दिवस चाललेल्या या धुमश्चक्रीत ६ दहशतवादी ठार झाले. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरियाने (इसिस)स्वीकारली होती. दहशतवादी तमीम चौधरी यानेच या हल्ल्याचा कट रचल्याची माहिती मिळाली होती.
अखेर या हल्लाच्या दोन महिन्यांनंतर शनिवारी बांगलादेश पोलिसांनी ढाका शहरापासून काही अंतरावर असलेल्या दहशतावद्यांच्या तळावर हल्ला करत त्यांना कंठस्नान घातले.