ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. ८ - मॅथ्यू चक्रीवादळाने अखेर अमेरिकेच्या फ्लोरिडा किनारपट्टीला शुक्रवारी धडक दिली. जोरदार वा-यासह इथे मुसळधार पाऊस कोसळत आहे. अमेरिकेत धडकण्यापूर्वी मॅथ्यू चक्रीवादामुळे हैतीमध्ये आतोनात नुकसान झाले आहे. जवळपास ८०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून, हजारो लोक बेघर झाले आहेत.
हैती कॅरेबियन बेटावरील एक गरीब देश आहे. कालपर्यंत हैतीमध्ये ३०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती होती. वादळामुळे प्रशासनाचा दुर्गम भागाशी संपर्क तुटला होता. आता जी माहिती समोर येतेय त्यानुसार हैतीमध्ये मोठया प्रमाणावर जिवीत व वित्तहानी झाली असून, ८०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
मॅथ्यू हे दशकभरातील अमेरिकेत आलेले सर्वात मोठे चक्रीवादळ आहे. फ्लोरिडा ते जॉर्जिया पर्यंत किनारपट्टीवर रहाणा-या नागरीकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. मॅथ्यू हे फ्लोरिडाला धडकणारे १०० वर्षातील सर्वात मोठे चक्रीवादळ असून, नागरीकांनी गाफील राहू नये असे आवाहन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केले आहे.