ऑनलाइन लोकमत
बर्लिन, दि. 5 - जर्मनीच्या सरकारने सोशल नेटवर्किंग कंपन्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. चिथावणीखोर भाषणं, घृणास्पद आणि सामाजिक तेढ वाढवणा-या पोस्ट सोशल मीडियावरून काढण्यास असमर्थ ठरलेल्या कंपन्यांवर ही कारवाई करण्यात येणार आहे. त्यांच्याकडून 50 मिलियन युरो म्हणजे जवळपास 3 अब्ज 46 कोटी 45 लाख रूपये इतका दंड आकारण्यात येणार आहे. यामध्ये ट्विटर आणि फेसबुकसारख्या नेटवर्किंग कंपन्यांचाही समावेश आहे.
शांतताप्रिय देशात अशा पोस्ट अत्यंत धोकादायक आणि हानिकारक आहेत. त्यामुळे भविष्यात विपरित परिणाम होऊ शकतात असं जर्मनीच्या सरकारने म्हटलं आहे. अशा घृणास्पद पोस्ट आणि चिथावणीखोर भाषणं काढून टाकण्याचे आदेश जर्मनीच्या सरकारकडून वारंवार देण्यात आले होते. पण त्यावर आळा बसला नाही. तसेच अशा पोस्ट थांबवण्यासाठी काहीही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. परिणामी आज 50 मिलियन युरो इतका दंड आकारण्याचा निर्णय जर्मनीच्या सरकारने घेतला.
सोशल मीडियाच्या कंपन्या आपल्या नेटवर्क प्लॅटफॉर्मद्वारे रग्गड नफा कमावणार आणि सामाजिक तेढ निर्माण करणा-या पोस्टवर कारवाई करण्याची वेळ आल्यावर ते पाठ फिरवणार हे योग्य नाही असं जर्मनी सरकारमधील एक मंत्री म्हणाले. या कारवाईनंतर आता सोशल नेटवर्किंग कंपन्यांना अपलोड होणा-या कंटेंवर नजर ठेवावी लागणार आहे.
यापुर्वी जर्मनीतील न्यायाधिशांनी सोशल मीडियावरून टाकल्या जाणा-या घृणास्पद आणि खोट्या पोस्टवर कारवाई करावी तसेच यासंबंधी कठोर कायदा बनवण्यात यावा अशी मागणी केली होती, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.