वॉशिंग्टन - मंगळ म्हटले की दिसतो तांबड्या रंगाचा ग्रहगोल. त्यावर जीवसृष्टी किंवा पाण्याचे अस्तित्व आहे का, त्याच्या भूगर्भात काय दडलेले असेल अशा अनेक गूढ प्रश्नांची उकल करण्याची आस खगोलशास्त्रज्ञांना अनेक वर्षांपासून लागलेली आहे. आता याचा शोध घेण्यासाठी नासा मंगळावर यांत्रिक माश्या पाठविणार आहे, पण नेमके कधी हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.मंगळासंदर्भात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संशोधन करण्यासाठी नासाकडे २३० प्रस्ताव आले होते. त्यातील एक प्रस्ताव यांत्रिक माश्या पाठविण्याबाबतचा होता. अशा माश्या बनविण्यासाठी नासाने संशोधकांना निधी दिला आहे.या यांत्रिक माश्यांना ‘रोबोटिक बीज’ असे नाव देण्यात आले आहे. मंगळावरील वातावरण पृथ्वीपेक्षा विरळ आहे. त्यामुळे या ग्रहावर उड्डाणासाठी या माश्यांचे पंख मोठ्या आकाराचे असतील. अमेरिकी व जपानी शास्त्रज्ञांनी संयुक्त संशोधनातून यांत्रिक माश्या बनविल्या आहेत. त्यांच्या शरीरात सेन्सर, वायरलेस संपर्क आदी उपकरणे बसविण्यात आली आहेत. मंगळावर भूप्रदेशाची मापे घेणे, खडक, माती आदींचे नमुने गोळा करणे, जीवसृष्टीचे अस्तित्व आढळल्यास त्याचे पुरावे गोळा करणे ही कामे या यांत्रिक माश्या करणार आहेत. मंगळ ग्रहावरील एकूण वातावरणाबाबत नासाने रोव्हर्सच्या माध्यमातून आधीपासून संशोधन सुरू असले, तरी ते धिम्या गतीने पुढे सरकते आहे. नासाने २०१२ साली क्युरिआॅसिटी रोव्हर मंगळावर उतरविला आहे. हा आजवर फक्त ११.२ मैलच अंतर कापू शकला आहे. रोव्हर प्रमाणेच यांत्रिक माश्यांचेही मोबाइल बेसद्वारे रिचार्जिंग होणार आहे. (वृत्तसंस्था)
नासा मंगळावर पाठविणार यांत्रिक माश्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 2:10 AM