कोरोना काळापासून भारत आणि चीनदरम्यान घुसखोरी आणि भारतीय सैन्यावर हल्ले केल्याने तणावाचे वातावरण आहे. हे वातावरण आता अखेरच्या स्टेजवर आले असून वेगवेगळ्या स्तरावर दोन्ही देशांनी एकमेकांशी संबंध तोडण्यास सुरुवात केली आहे. भारताने चिनी कंपन्यांच्या अॅप्सवर बंदी आणली होती. ती कायम ठेवली आहे. असे असताना आता दोन्ही देशांतील पत्रकारितेचे संबंधही जवळपास संपुष्टात येत आहेत.
चीनने भारताच्या एकमेव पत्रकाराला देश सोडण्याचे आदेश दिले आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या पत्रकाराला या महिन्याच्या अखेरपर्यंत चीन सोडून जाण्यास सांगितले आहे. या पत्रकारावर चिनी पत्रकारांसोबत चुकीचे वागल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. परंतू प्रकरण वेगळेच आहे.
चिनी अधिकाऱ्यांनी पीटीआयच्या या रिपोर्टरला देश सोडण्यास सांगितलेय तो भारताने केलेल्या कृतीचा बदला आहे. या पत्रकाराने चीन सोडले तर बिजिंगमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा एकही पत्रकार राहणार नाही. ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार या वर्षाच्या सुरुवातीला भारताचे चीनमध्ये चार पत्रकार होते. मात्र, गेल्या आठवड्यातच हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टरने चीन सोडला. प्रसार भारती आणि द हिंदूच्या दोन पत्रकारांचा व्हिजा रिन्यू करण्यास चीनने एप्रिलमध्येच नकार दिला होता. यामुळे त्यांनी तेव्हाच देश सोडला होता.
चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. हा प्रकार भारतातही काही काळापूर्वी घडला आहे. भारतात फक्त एकच चिनी पत्रकार उरला आहे, जो अजूनही व्हिसाच्या नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. यापूर्वी, भारताने चीनच्या अधिकृत माध्यम शिन्हुआ न्यूज एजन्सी आणि चायना सेंट्रल टेलिव्हिजनच्या दोन पत्रकारांचे व्हिसा नूतनीकरण अर्ज भारताने नाकारले होते. यामुळे आता चीनने देखील तेच पाऊल उचलले आहे. गेल्या महिन्यात चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी ही माहिती दिली होती.