वॉशिंग्टन : काश्मीर मुद्यात अमेरिकेने हस्तक्षेप करावा यासाठीचे प्रयत्न ओबामा प्रशासनाने लाथाडल्यानंतर पाकिस्तानने आता आपण अशी कधी मागणीच न केल्याचा कांगावा सुरू केला आहे. काश्मीर मुद्यात अमेरिकेने हस्तक्षेप करावा ही आपली मागणी नाही, तर केवळ इच्छा असून ती आपण अमेरिकन नागरिकांच्या कानी घातली, अशी मखलाशी पाकने केली. पाकचे मावळते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज म्हणाले की, भारत-पाकची काश्मीरवरील द्विपक्षीय चर्चा फलद्रूप होत नसल्याचे आंतरराष्ट्रीय समुदायाने लक्षात घ्यायला हवे. दोघांच्या चर्चेतून मार्ग निघत नसल्यामुळे आम्हाला तिसऱ्याची मध्यस्थी हवी आहे. तथापि, आम्ही कधीही अमेरिकेकडे मध्यस्थीची मागणी केली नाही. भारत व पाक जोपर्यंत संयुक्तरीत्या म्हणत नाहीत तोपर्यंत आपण काश्मीर मुद्यावर मध्यस्थी करणार नसल्याचे अमेरिकेने शरीफ यांच्या दौऱ्यादरम्यान पुन्हा स्पष्ट केले. यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अजीज बोलत होते. भारत-पाक द्विपक्षीय पद्धतीने आपसातील वाद सोडवतील, असे सिमला करारात ठरलेले आहे; परंतु गेल्या ४० वर्षांत चर्चेतून काहीही निष्पन्न झालेले नाही, तर मग तोडगा कसा निघेल, असा सवालही त्यांनी केला. (वृत्तसंस्था)
काश्मीरवर मध्यस्थी; पाकचा नवा कांगावा
By admin | Published: October 25, 2015 4:05 AM