नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने जगभरात जनजीवन विस्कळीत केलं आहे. महामारीचा फटका जगाती बलाढ्या देशांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागला आहे. तब्बल 5 महिन्यानंतर देशातील परिस्थिती पूर्वपदावर येताना दिसत आहे. लोकांना लोकांपासून तोडण्याचं काम या कोरोनानं केलं आहे. अगदी जवळच्या नातेवाईकांपासूनही दो गज की दूर ठेऊनच प्रेम व्यक्त होताना दिसत आहे. मात्र, एका प्रेमी युगलाने कोरोनाचं बंधन तोडत प्रेमासाठी असंच दाखवून दिलंय. ऑस्ट्रेलियातील एका बॉयफ्रेंडने क्वारंटाईन सेंटरमधून पलायन करत गर्लफ्रेंडची भेट घेतली.
ऑस्ट्रेलियातील पर्थ येथील ही एक दुजे के लिए ची सत्यकथा आहे. युसूफ काराकया नावाच्या युवकाने हे धाडस दाखवले असून ऑस्ट्रेलियातील सिडनी येथून 30 जुलैरोजी युसूफ पर्थला पोहोचला. त्यामुळे, युसूफला क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र, आपल्या गर्लफ्रेंडचा विरह त्याला सहन झाला नाही, त्यामुळे तिला भेटण्यासाठी तो लपून छपून तिच्याकडे पोहोचला. डेली मेलच्या वृत्तानुसार, युसूफला पर्थ येथील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. या हॉटेलमधील तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून तो बाहेर पडायचा आणि त्याच्या प्रेयसीला भेटायला जात. त्यानंतर, रात्रीच्या अंधारात चोरपावलांनी खिडकीतूनच हॉटेलमध्ये येत.
क्वारंटाईनमध्ये असताना अनेकदा युसूफने असंच केलं. मात्र, एकदिवशी तेथील स्टाफने खिडकीच्या खाली लावण्यात आलेली शिडी काढल्यानंतर युसूफच्या प्रेयसी भेटीचा भांडाफोड झाला. याप्रकरणी माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांनी त्यास अटक केली. कोरोनाचे नियम तोडून कायद्याचा भंग केल्याप्रकरणी तेथील न्यायालयाने युसूफला 6 महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. गर्लफ्रेंडचा बर्थ डे असल्याने तिला भेटण्यासाठी गेलो होतो, असे युसूफने कोर्टात सांगितले. मात्र, न्यायालयाने त्यास 6 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. पण, त्यास केवळ 1 महिनाच तुरुंगात रहावे लागणार आहे. कारण, बाकीची शिक्षा एक वर्षासाठी स्थगित करण्यात आली आहे.