रोसेऊ: पंजाब नॅशनल बॅकेत १३ हजार ५०० कोटींचा घोटाळा करून मेहुल चोक्सी भारतातून फरार झाला असून, त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू आहे. डॉमिनिकाच्या तुरुंगातून जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या मेहुल चोक्सीला डॉमिनिका सरकारने घुसखोर म्हणून जाहीर केले आहे. यामुळे मेहुल चोक्सीच्या अडचणी वाढणार असून, भारताकडे प्रत्यार्पण करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगितले जात आहे. (mehul choksi is declared a prohibited immigrant by Dominica govt)
डॉमिनिका उच्च न्यायालयात मेहुल चोक्सीने जामिनासाठी याचिका दाखल केली होती. तसेच मी कायद्याचे पालन करणारा व्यक्ती आहे. डोमिनिका सोडून कुठेही जाणार नाही. मी उपचारांसाठी भारत सोडला. भारताच्या तपास संस्थांपासून पळून आलेलो नाही, असे दावे करणारे प्रतिज्ञापत्र मेहुल चोक्सीने सादर केले होते. मात्र, डॉमिनिका सरकारने मेहुल चोक्सीला ‘विना परवानगी देशात प्रवेश केलेला अवैध प्रवासी’ म्हणून जाहीर केले आहे.
मेहुल चोक्सीचा बेकायदेशीररित्या प्रवेश
डॉमिनिका सरकारने मेहुल चोक्सीला घुसखोर जाहीर केल्यानंतर डॉमिनिकाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री रेबन ब्लॅकमोर यांनी चोक्सीला डॉमिनिकामधून बाहेर काढण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. दुसऱ्या बाजूला चोक्सीने ब्रिटनमधील नावाजलेल्या वकिलांची फौज मदतीला घेतल्याचे बोलले जाते. डॉमिनिकामधून भारताकडे न सोपवता अँटिग्वामध्ये परत जाता यावे, यासाठी चोक्सी जोरदार प्रयत्न करत आहे, असे सांगितले जात आहे.
“कोणतीही डील करून नाही तर देशहितासाठी भाजपमध्ये आलोय”: जितीन प्रसाद
मेहुल चोक्सीला २३ मे रोजी अटक
मेहुल चोक्सीकडे अँटिग्वा अँड बार्बुडाचे नागरिकत्व असून तो मागील तीन वर्षांपासून या देशात लपून बसला होता. डॉमिनिका पोलिसांनी देशात बेकायदेशीर प्रवेश केल्याबाबत मेहुल चोक्सीला २३ मे रोजी अटक केली होती. स्थानिक न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर मेहुल चोक्सीने डॉमिनिकाच्या उच्च न्यायालयात धाव घेतली. तेथे प्रतिज्ञापत्रही सादर केले. मात्र, डॉमिनिका सरकारने घुसखोर जाहीर केल्यामुळे मेहुल चोक्सीच्या अडचणी वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.
देशाची अर्थव्यवस्था वाचवण्याचा ‘हाच’ एकमेव उपाय; माजी गव्हर्नरांनी दिला महत्त्वाचा पर्याय
दरम्यान, मेहुल चोक्सीने केलेली याचिका वैध नसून, त्याला भारताकडे सोपवावे, अशी स्पष्ट भूमिका डोमिनिका सरकारने न्यायालयात मांडली आहे. भारतानेही मेहुल चोक्सीला भारतात परत आणण्यासाठी कायदेशी प्रक्रियेला वेग दिल्याचे सांगितले जात आहे. मेहुल चोक्सीने आपले अपहरण करुन डोमिनिकाला नेल्याचा आरोप केला होता. मेहुल चोक्सी भारतातील फरार हिरे व्यापारी नीरव मोदीचा मामा आहे. हे दोघेही १३ हजार कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी आहेत.