अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये नवरात्री हिंदू नागरिकांनी कीर्तन आणि जागरण केलं. अफगाणिस्तानात सध्या तालिबानचं राज्य आलं आहे, तालिबानच्या राज्यात पुन्हा एकदा सर्व कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. मात्र तरीही अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समुदायाने इथं कार्यक्रम केल्याची माहिती आहे. हिंदू समुदायाकडून मंगळवारी काबुलच्या असमाई मंदिरात (Asamai Mandir) हा कार्यक्रम करण्यात आला.
दरम्यान, अस्माई मंदिराच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राम शरण सिंह यांनी सांगितले की, नवरात्रीनिमित्त काबुलच्या असमाई मंदिरात किर्तन, जागरण तर झालंच, शिवाय भंडाऱ्याचंही आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात गरीब लोकांना अन्नदान करण्यात आलं. या कार्यक्रमात दीडशेच्या वर लोक जमले होते. ज्यात बहुतांश हिंदू आणि शीख नागरिक होते. तालिबानकडून या कार्यक्रमात कुठलाही व्यत्यय आला नाही.
रविंदर सिंह रॉबिन यांच्या @rsrobin1 या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. सोशल मिडियावर हा व्हिडिओ बऱ्याच प्रमाणात व्हायरल होत आहे.