नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक विजेते अमित पांघल आणि गौरव सोलंकीने जर्मनी येथे सुरू असलेल्या केमिस्ट्री चषक मुष्टियुद्ध स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी स्टार विकास कृष्ण याला ७५ किलोवजनी गटात मात्र पराभवास सामोरे जावे लागले.उपांत्यपूर्व फेरीत ४९ किलो गटात अमितने जर्मनीच्या ख्रिस्टिफर गोमनला ५-० गुणांनी पराभूत केले. दुसरीकडे गौरवने ५२ किलो गटात रशियाच्या वादिम कुद्रियाकोव्हला ५-० गुणांनी नमवित अंतिम चारमध्ये प्रवेश केला. धीरज रांगी (६४ किलो) यानेही पदक निश्चित केले. मात्र, विकासच्या पराभवाचा भारताला धक्का बसला. क्यूबाचा आॅलिम्पिक चॅम्पियन अर्लेन लोपेझ याने विकासला नमविले. राष्टÑकुल रौप्य विजेता मनीष कौशिक (६०), कांस्य विजेता नमन तंवर (९१), माजी आशियाई युवा रौप्य विजेता अंकुश दहिया (६० किलो) हे पहिल्याच फेरीत पराभूत झाले. (वृत्तसंस्था)>सोनिया, लवलिना अंतिम चारमध्येभारताच्या सोनिया लाठेर आणि लवलिना बोरगोहेन यांनी आपआपल्या वजन गटात अनुक्रमे मयागमार गुंदेगमा व सुचादा पानिचचा पराभव करून मंगोलिया येथे सुरू असलेल्या उलनबटेर चषक मुष्टियुद्ध स्पर्धेत अंतिम चारमध्ये प्रवेश केला.जागतिक व आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेती सोनियाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून ५७ किलो गटातील विजेतेपदाची प्रबळ दावेदार मयागमार गुंदेगमाचा पराभव करून उपांत्यफेरीत प्रवेश केला. दुसरीकडे इंडिया ओपनची सुवर्णपदक विजेती लवलिनाने ६९ किलो गटात थायलंडच्या सुचादा पानिचला ५-० गुणांनी नमवित अंतिम चारमधील आपली जागा निश्चित केली.
जर्मनीत भारतीय पुरुषांचा धडाका, विकास कृष्णला पराभवाचा धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 3:49 AM