संयुक्त राष्ट्रे : ‘‘पुरुषांनी महिलांचे पंख कापू नयेत. त्यांना उडू द्यावे,’’ असे नोबेल पुरस्काराने सन्मानीत युसुफझाई मलाला हिने म्हटले. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अॅन्टोनिओ गुटेरेझ यांनी मलाला हिला संयुक्त राष्ट्रांची सगळ््यात तरूण (१९) ‘शांततेची दूत’ असा सन्मान बहाल केलेल्या कार्यक्रमात ती बोलत होती. युसुफझाई मलाला म्हणाली की,‘‘पुरुष, वडील आणि भावांची भूमिका खरोखर खूप महत्वाची आहे. स्वात खोऱ्यात माझ्यासारख्या किती तरी मुली बोलू शकल्या असत्या परंतु त्यांच्या वडिलांनी त्यांना तशी परवानगीच दिली नाही. त्यांच्या भावांनी त्यांना तसे करू दिले नाही. माझी परिस्थिती वेगळी होती. मला माझ्या वडिलांनी थांबवले नाही.’’ जागतिक नागरिक असलेल्या व्यक्तिला संयुक्त राष्ट्रांच्या वतीने हा सर्वोच्च सन्मान दिला गेला.‘‘तू तुला हवे ते बोलू शकतेस, असे म्हणणारे वडील आणि माझे कुटुंबीय होते. मला वाटते आम्हाला अगदी असेच हवे आहे. कुटुंबात महिलांना जे हवे ते करू देणारे भाऊ आणि वडील आणि पुरुष आम्हाला हवे आहेत,’’ असे मलाला म्हणाली. युसुफझाई म्हणाली की, ‘‘माझे वडील लोकांना नेहमी असे म्हणायचे की मलाला हिच्यासाठी मी काय केले हे विचारू नका तर मी काय करू शकलो नाही हे विचारा. मी तिचे पंख कापले नाहीत.’’
पुरुषांनी महिलांचे पंख कापू नयेत : मलाला
By admin | Published: April 12, 2017 12:25 AM