अंकारा, दि. 25 - सोशल मीडियावर बेजबाबदार वक्तव्य करणं तुम्हाला महागात पडू शकतं. याचाच प्रत्यय तुर्कीतील एका महिला मॉडेलला आला आहे. काही दिवसांपूर्वी 18 वर्षीय मॉडेलने आपल्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट केले होते. त्यात तिने मासिक पाळीतील रक्ताची तुलना शहिदांच्या रक्ताशी केली होती. या कारणामुळे तिच्याकडून ह्यमिस तुर्कीह्णचा किताब काढून घेण्यात आला आहे.
इतिर एसेन असे त्या 18 वर्षीय महिला मॉडेलचं नाव आहे. तीनं मिस तुर्की या स्पर्धेत भाग घेऊन किताब पटकावला होता. परंतु काही वेळातच तिच्याकडून हा किताब काढून घेण्यात आला. तिने केलेले हे वादग्रस्त ट्विट आयोजकांसमोर आले. मिस तुर्की जगात देशाचे प्रतिनिधत्व करण्याचे काम करते त्यामुळे तिचे हे वक्तव्य योग्य नसल्याचे सांगत आयोजकांनी तिच्याकडून हा किताब काढून घेतला. इतिराऐवजी फर्स्ट रनरअप ठरलेली अस्ली सुमेन चीनमध्ये होणाऱ्या मिस वर्ल्ड स्पर्धेत तुर्कस्थानाचं प्रतिनिधीत्व करणार आहे.
15 जुलैला तुर्कस्तानातील सत्तांतराच्या प्रयत्नाचा पहिला वर्धापन दिवस होता. वर्षभरापूर्वी झालेल्या सत्तांतराच्या प्रयत्नात सैनिकांशी लढताना सुमारे 250 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्याच वर्धापनदिनानिमित्त इतिराने हे ट्विट केले असून त्यात शहीद झालेल्यांच्या रक्ताची तुलना मासिक पाळीतील रक्ताशी केली होती. यावरुन तुर्की तसेच जगभरातून तिच्यावर संताप व्यक्त करण्यात येत होता. याचीच परिचीती म्हणून तिचा मिस तुर्की हा किताब काढून घेण्यात आला आहे. हे वादग्रस्त ट्विट व्हायरल झाल्यानंतर आयोजकांना हा निर्णय घ्यावा लागला. मिस तुर्की संघटनेकडून अशा प्रकारच्या ट्वीट्सना प्रोत्साहन देण्याची शक्यताच नाही. जगात देशाची प्रतिमा उंचावण्याचं काम मिस तुर्की करते. असं सांगत आयोजकांनी इतिरचा किताब परत घेतला. इतिर एसेनला ह्या ट्विटनं चांगलीच अद्दल घडवून गेली असेच म्हणावं लागेल.