ऑनलाइन लोकमत
म्युनिच, दि. ९ - व्यावसायिक स्पर्धेमध्ये नेहमीच एक कंपनी दुस-या कंपनीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असते. आपला ब्राण्ड अधिकाधिक मोठा करण्याचा प्रत्येक कंपनीचा प्रयत्न असतो. या व्यावसायिक स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धी कंपनीला सन्मान दिल्याची उदहारणे फार दुर्मिळ सापडतील.
बीएमडब्लू आणि मर्सिडीज बेन्झ या वाहन उद्योगक्षेत्रातील जगातील दोन आघाडीच्या जर्मन कंपन्यांनी स्पर्धा करतानाही ही नैतिकता जपली आहे. मिर्सिडीजची व्यावसायिक स्पर्धक असलेल्या बीएमडब्लूने दोन दिवसांपूर्वी ७ मार्चला १०० वर्ष पूर्ण केली.
त्यानिमित्ताने मिर्सिडीजने बीएमडब्लूला सोशल मिडीयावरुन शुभेच्छा दिल्या आहेत. मर्सिडीजने सोशल मिडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला असून, शंभर वर्षाच्या स्पर्धेबद्दल बीएमडब्लूचे आभार मानले आहेत. मिर्सिडीजने आपले संग्रहालय पाहण्यासाठी बीएमडब्लूच्या कर्मचा-यांना निमंत्रणही दिले आहे. बीएमडब्लू आणि मर्सिडीज हे भारतातील गाडयांचे लोकप्रिय ब्राण्डस आहेत. या दोन्ही कंपन्या आलिशान गाडयांच्या निर्मितीसाठी ओळखल्या जातात.
मर्सिडीजचे टाटा कन्केशन
भारतापुरता विचार करायचा तर, बीएमडब्लूच्या आधी मर्सिडीजचा वावर सुरु झाला. प्रसिद्ध उद्योगपती जे.आर.डी. टाटा यांनी ट्रक उत्पादनासाठी मर्सिडीज बरोबर सहकार्याचा करार केला होता. त्या करारावर टाटांनी ज्या पेनाने स्वाक्षरी केली ते पेन मर्सिडीजने त्यांच्या लोगोसह भेट म्हणून दिले होते. ते पुढे अनेक वर्ष जेआरडींनी अगत्याने वापरले. ( लेटर्स ऑफ जेआरडी टाटा- दोन खंड या संग्रहात मिळतो) भारतात मर्सिडीज वापरणा-यांचे क्लबही तयार झाले आणि त्याच्या कितीतरी आधी पं.भीमसेन जोशी यांच्यासारखे दिग्गज मर्सिडीजचे जणू अघोषित अॅम्बेसिडर होते.
मर्सिडीजने कालच भारतात आपली सर्वात महागडी मेबाच एस ६०० गाडी लॉंच केली. या गाडीची किंमत साडेदहा कोटी रुपये आहे.