ऑनलाइन टीम
इस्लामाबाद, दि. ११ - काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला असून काश्मीरचे भारतातील विलीनीकरण पाकिस्तानला कधीच मान्य नव्हते असे विधान पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या तस्नीम अस्लम यांनी केले आहे. काश्मीर मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्रने दिलेला प्रस्तावच उपयुक्त आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
भारत सरकारने संयुक्त राष्ट्राच्या पर्यवेक्षक दलाला दिल्लीतील कार्यालय रिकामे करायला सांगितले आहे. या पर्यवेक्षक समुहाची आता गरज नाही असे भारत सरकारने स्पष्ट केले होते.. भारताच्या या निर्णयावर पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या तस्नीम अस्लम यांनी प्रतिक्रिया दिली. अस्लम म्हणाल्या, पर्यवेक्षकांना कार्यालय रिकामे करायला लावून काश्मीर मुद्द्यावर प्रभाव पडणार नाही. काश्मीर मुद्द्यावर तोडगा निघेपर्यंत संयुक्त राष्ट्र संघाने दिलेल्या नियमावलीचे पालन केले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले,
संयुक्त राष्ट्राने पर्यवेक्षकांचा एक गट भारत आणि पाकिस्तानमधील शांतीसंबंधावर नजर ठेवण्यासाठी दिल्लीत नेमला होता. गेल्या ४० वर्षांपासून या गटाचे दिल्लीत कार्यालय असून हे कार्यालय त्यांना मोफत मिळाले होते.