ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - व्हॉट्स अॅपवरचे मेसेज युजर्सनी डिलिट केले तरी ते यंत्रणेमधून संपूर्णपणे काढून टाकले जात नसल्याचा दावा अॅपलचे सेक्युरिटी तज्ज्ञ जोनाथन झिरास्की यांनी केला आहे. यामुळे संपूर्ण पणे सुरक्षेचा दावा करणाऱ्या व्हॉट्स अॅपच्या माहिती सुरक्षित असल्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
Whats App Chat जर युजरने डिलीट केलं किंवा Clear All Chat केलं तरी ही संभाषणं मागे उरत असल्याचे नुकत्याच केलेल्या चाचणीत आढळल्याचे झिरास्की यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. याचा अर्थ युजर्स त्यांना नको असलेले चॅट डिलिट करत असला तरी ते संपूर्णपणे नष्ट झाले असे मानता येणार नाही आणि त्याचा गैरवापर होऊ शकतो.
जर, तुम्हाला व्हॉट्स अॅपवरचे चॅट संपूर्णपणे डिलिट करायचे असतील तर फोनमधून व्हॉट्स अॅपच काढून टाकणे हा एकमेव पर्याय असल्याचंही झिरास्की यांनी केलं आहे.
"व्हॉट्स अॅपच्या सुरक्षिततेची चाचणी करण्यासाठी मी काही chat केले. मग, काही संभाषणं achive केली.. काही संभाषणं क्लिअर केली आणि काही संभाषणं डिलिट केली. त्यानंतर Clear All Chats चा वापर केला." झिरास्की यांनी म्हटलंय. त्यांनी पुढे असंही सांगितलं की, इतकं सगळं केल्यावरही डेटाबेसमध्ये डिलिट केलेली संभाषणं आढळून आली.
अर्थात, व्हॉट्स अॅप हे जाणुनबुजून करत नसल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. व्हॉट्स अॅप रेकॉर्ड डिलिट करतं, आणि डेटाबेसमध्ये जो डेटा राहतो तो कंपनी मुद्दामहून ठेवते असं नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
अर्थात, ही समस्या iOS अॅपपुरती मर्यादित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. झिरास्की सांगतात, यामुळे लगेच पॅनिक होऊ नका, मात्र व्हॉट्स अॅपचा मेसेज डिलिट केला म्हणजे तो मोबाईल मधून कायमचा गेला या भ्रमात राहू नका इतकंच.