जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल आठ कोटींवर पोहोचली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे विविध उपाय हे केले जात आहेत. कोरोना लसीवर युद्धपातळीवर संशोधन सुरू असून महत्त्वाची माहिती ही सातत्याने समोर येत आहे. याच दरम्यान काही ठिकाणी कोरोना लसीचे साईड इफेक्ट देखील समोर आले आहेत. पोर्तुगालमध्ये कोरोनावरील फायझर (Pfizer) लस घेतल्यानंतर 48 तासांच्या आत एका आरोग्य कर्मचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सोनिया असेवेडो ( Sonia Acevedo) असे या 41 वर्षीय महिलेचे नाव असून फायझर लसीचा डोस घेतल्यानंतर कोणतेही दुष्परिणाम झाले नाहीत. मात्र, त्यांचा अचानक मृत्यू झाला. अशीच एक घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे.
मेक्सिकोमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर एका महिला डॉक्टरला अर्धांगवायूचा झटका आला आहे. या महिला डॉक्टरने लस घेतल्यानंतर अर्ध्या तासातच त्यांना अशक्तपणा, डोकेदुखी श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. कार्ला सेसेलिया पेरेज असं महिला डॉक्टरचं नाव असून त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मेक्सिकोच्या आरोग्य मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. लसीचा दुष्परिणाम झालेल्या डॉक्टर कार्ला पेरेझ यांच्या मेंदूत आणि मणक्यात सूज आली होती. त्यावर उपचार करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.
कुटुंबीयांनी केली चौकशीची मागणी
डॉक्टर कार्ला यांना अँटीबायोटीकची एलर्जी असल्याची माहिती समोर आली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर कार्ला यांना अर्धांगवायूचा झटका हा लसीमुळे आला असे ठामपणे सांगता येणार नाही. मात्र लसीमुळे हा दुष्परिणाम झाला का हे तपासले जात आहे. लसीमुळेच अर्धांगवायूचा झटका आला का हे पाहण्यासाठी अधिक संशोधनाची आवश्यकता आहे. तर दुसरीकडे डॉक्टर कार्ला यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे.
आरोग्य मंत्रालयाने 32 वर्षीय कार्ला यांना फायजरची कोरोना लस देण्यात आली होती. लस दिल्यानंतरच्या काही वेळेतच त्यांची प्रकृती बिघडली. सध्या कार्ला यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधी काही दिवसांपूर्वी कोरोनावरील फायझर (Pfizer) लस घेतल्यानंतर 48 तासांच्या आत एका आरोग्य कर्मचारी महिलेचा मृत्यू झाला आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, सोनिया या पोर्तो शहरातील पोर्तुगाल इन्स्टिट्यूट ऑफ ऑन्कोलॉजी (Portuguese Institute of Oncology) येथे कार्यरत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना कोणताही गंभीर आजार किंवा साइड इफेक्ट्स झाले नाहीत आणि त्या निरोगी होत्या असे सांगण्यात येत आहे.
धक्कादायक! Pfizer लस घेतल्यानंतर हेल्थ वर्करचा मृत्यू, फिनलँड-बल्गेरियामध्ये साइड इफेक्ट्ची प्रकरणे
सोनिया ठीक होत्या. त्यांना आरोग्यसंबंधी कोणतीही समस्या नव्हती. तसेच, त्यांना कोविडची लक्षणे नव्हती. एक दिवस आधी त्यांना कोरोनाची लस देण्यात आली होती, असे सोनिया यांचे वडील अबिलियो असेवेडो यांनी पोर्तुगीज डेली वृत्तपत्राला सांगितले. तसेच, सोनिया यांचा मृत्यू कशामुळे झाला याचे मला उत्तर हवे आहे, असेही अबिलियो असेवेडो म्हणाले. पोर्तुगाल इन्स्टिट्यूट ऑफ ऑन्कोलॉजीने असे निवेदन प्रसिद्ध केले आहे की, 30 डिसेंबर रोजी सोनिया यांना लस देण्यात आली होती आणि 1 जानेवारीला त्यांचा अचानक मृत्यू झाला. सोनिया यांच्या तब्येतीत लस घेतल्यानंतर दुष्परिणाम दिसले नाहीत. मृत्यूचे कारण शोधण्यात येत आहे, परंतु सोनिया यांच्या हेल्थ रेकॉर्डनुसार त्यांची तब्येत ठीक होती.