मेक्सिकोमध्ये अंदाधुंद गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बारमध्ये झालेल्या गोळीबारात नऊ जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मेक्सिकोमधील गुआनाजुआतोमध्ये हा गोळीबार झाला आहे. यात दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून गटांमधील हिंसाचारात वाढ झाली असल्याचं स्थानिक प्रशासनाने सांगितलं आहे. दोन गटातील वादातूनच हा गोळीबार झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारातील मृतांमध्ये पाच पुरुष आणि चार महिलांचा मृत्यू झाल्या. दोन महिला जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री एक गट हातात बंदुका घेऊन बारमध्ये घुसला होता. यावेळी त्यांनी बारमध्ये असणाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. हल्लेखोरांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस आणि प्रशासन याप्रकरणी तपास करत असून त्यांचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळी गुन्हेगारी गट असल्याचा संकेत देणारी दोन पोस्टर्स आढळली आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"