मेक्सिको सिटी - अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या 311 भारतीयांना पुन्हा मायदेशात परतावे लागले आहे. या भारतीयांना अमेरिकेत जाण्यासाठी जवळपास 25 ते 30 लाख रुपयांचा खर्च आला. तसेच, त्यांना यासाठी नाहक त्रास सोसावा लागला आणि परत भारतात पाठविल्यामुळे त्यांच्यात नाराजीचे वातावरण पसरले आहे.
गुरुवारी मेक्सिकोने 311 भारतीयांना अवैधरित्या देशात आल्यामुळे भारतात पाठविले. हे भारतीय नागरिक मेक्सिकोहून अमेरिकेत जाण्याची तयारी करत होते. मात्र, मेक्सिकोहून या सर्व भारतीयांची दिल्लीला रवानगी केली आली. हे सर्व भारतीय शुक्रवारी सकाळी बोईंग 747-400 चार्टर विमानाने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. याबाबत मॅक्सिकोच्या नॅशनल मायग्रेशन इंस्टिट्यूटकडून माहिती देण्यात आली आहे.
आयएनएमकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, 'ज्या भारतीयांना परत पाठविण्यात आले आहे. ते 60 फेडरल मायग्रेशन एजन्ट्सच्या माध्यमातून मेक्सिकोत पोहोचले होते. चौकशी केली असता त्यांच्याजवळ आवश्यक कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. आवश्यक असणारी कागदपत्रे नसतानाही गेल्या काही महिन्यांपासून हे सर्व जण त्याठिकाणी राहत होते.'
सुत्रांच्या माहितीनुसार, या सर्व नागरिकांनी 25-30 लाख रुपये एजन्टला दिले होते. या भारतीयांना मेक्सिको बॉर्डवरून अमेरिकेत पाठविण्याचे आणि नोकरी देण्याचे कारण देत एजन्ट्सनी त्यांच्याकडून पैसे घेतले. तसेच, या रक्कमेत विमान प्रवाससह मेक्सिकोत राहण्याची व्यवस्था केली असल्याचे समजते.
आवश्यक कागदपत्रांची कमतरतामेक्सिकोच्या नॅशनल मायग्रेशन इंस्टिट्यूटच्या माहितीनुसार, डिपॉर्ट करण्यात आलेल्या भारतींयाकडे याठिकाणी राहण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे नव्हती. या सर्वांना इमिग्रेशन प्रशासनसमोर हजर करण्यात आले. मेक्सिकोच्या ओकासा, बाजा, कॅलिफॉर्निया, वरॉक्रूज, चिपास, सोनोरा, मेक्सिको सिटी, दुरंगो येथील प्रशासनासमोर सर्व अवैध प्रवाशांना हजर करण्यात आले होते.