मॅक्सिको सिटी : पश्चिम मेक्सिकोच्या मिचोआकान (Michoacan) राज्यात कोंबड्यांच्या झुंजीदरम्यान झालेल्या गोळीबारात 19 जणांचा मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली. कोंबड्यांच्या झुंजीच्या एका बेकायदेशीर स्पर्धेदरम्यान, काही बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केला. यावेळी उपस्थित काही लोकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामागचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नसून, रविवारी रात्री घडलेली ही घटना टोळीयुद्धातून घडल्याचे समजते.
या भागात अनेक गुन्हेगारी टोळ्या सक्रिय आहेत, ज्या दररोज टोळीतील इतर सदस्यांवर हल्ले करतात. गेल्या काही महिन्यांत, मेक्सिकोमध्ये अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे, जेव्हा बंदूकधाऱ्यांनी पार्क, बार आणि क्लबवर हल्ले करून प्रत्युत्तर दिले. या दरम्यान अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला.
मिचोआकनच्या सार्वजनिक सुरक्षा अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, हिंसाचारात सहभागी असलेल्या आरोपींना पकडण्यासाठी ठिकठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. मिचोआकन आणि त्याच्या शेजारचे गुआनाजुआटो हे मेक्सिकोमधील 2 सर्वात हिंसक राज्ये आहेत. अमली पदार्थांची तस्करी आणि चोरीच्या तेलाची (इंधन) विक्री यांसारख्या अनेक बेकायदेशीर कामे येथे होतात. यामध्ये सामील असलेल्या टोळ्यांमध्ये टोळीयुद्धाच्या घटना अनेकदा समोर येतात.
गेल्या महिन्यातही गोळीबाराची घटना घडली होतीगेल्या महिन्यात फेब्रुवारी महिन्यात याच राज्यात झालेल्या गोळीबारात 17 जणांचा मृत्यू झाला होता. मिचोआकनचे मंत्री रिकार्डो मेजिया यांनी सांगितले की, जलिस्को न्यू जनरेशन कार्टेलच्या एका सेलने दुसऱ्या सेलचा बदला घेण्यासाठी हा गोळीबार केला होता. 2006 पासून मेक्सिकोमध्ये ड्रग कार्टेलशी संबंधित हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार, तेव्हापासून आतापर्यंत 3 लाख 40 हजारांहून अधिक हत्या झाल्या आहेत. टोळीयुद्धादरम्यान झालेल्या गोळीबारात बहुतेकांचा मृत्यू झाला. या महिन्याच्या सुरुवातीला मध्य मेक्सिकोमधील एका घरावर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात नऊ जण ठार झाले होते.