मेक्सिकोतील सिनालोआमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. मेक्सिकन नौदलाचे ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर कोसळले आहे. यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. नौदलाचं हे हेलिकॉप्टर अत्यंत महत्त्वाचं मान जातं. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 15 जण होते. या अपघातात 14 जणांना जीव गमवावा लागला. तर जखमीवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
नौदलाने एका निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेमागचं नेमकं कारण तपासले जात आहे. सिनालोतील ड्रग्ज माफिया राफेल कारो क्विंटेरो याच्या अटकेमुळेच हा घातपात घडवल्याचं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप नौदलाने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्ज माफिया राफेल कारो क्विंटेरोला अटक केल्यानंतर लगेचच ही घटना घडली.
राफेल कारो क्विंटेरो हा एफबीआयच्या यादीतील गुन्हेगारांपैकी एक आहे. शुक्रवारी मेक्सिकन पोलिसांनी राफेल कारो क्विंटेरोला अटक केली. ज्याला 1985 मध्ये अमेरिकन अँटी-नार्कोटिक्स अधिकाऱ्याची हत्या आणि छळ केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. किंगपिन 1980 च्या दशकात ग्वाडालजारा कार्टेलचा सह-संस्थापक म्हणून प्रसिद्ध झाला, जी लॅटिन अमेरिकेतील सर्वात शक्तिशाली ड्रग-तस्करी संघटनांपैकी एक होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.