रशिया-युक्रेनमध्ये शांततेसाठी समिती नेमा, PM मोदींना समितीत घ्या; मेक्सिकोची मागणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 01:33 PM2022-09-23T13:33:02+5:302022-09-23T13:34:20+5:30

रशिया-युक्रेनमधील युद्ध अजूनही सुरू आहे आणि तो संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय आहे. संपूर्ण जगासह रशिया आणि युक्रेनमध्ये शांततेसाठी भारतानेही प्रयत्न केले आहेत.

mexico proposes un to set up a committee with pm narendra modi and other global leaders to bring peace between russia and ukraine | रशिया-युक्रेनमध्ये शांततेसाठी समिती नेमा, PM मोदींना समितीत घ्या; मेक्सिकोची मागणी!

रशिया-युक्रेनमध्ये शांततेसाठी समिती नेमा, PM मोदींना समितीत घ्या; मेक्सिकोची मागणी!

googlenewsNext

रशिया-युक्रेनमधील युद्ध अजूनही सुरू आहे आणि तो संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय आहे. संपूर्ण जगासह रशिया आणि युक्रेनमध्ये शांततेसाठी भारतानेही प्रयत्न केले आहेत. अशा परिस्थितीत आता मेक्सिकोने रशिया आणि युक्रेनमध्ये कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्राकडे एक महत्वाची मागणी केली आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात यावी, ज्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पोप फ्रान्सिस आणि संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांचा समावेश असावा, अशी मागणी मेक्सिकोनं केली आहे.

मेक्सिकोचे परराष्ट्र मंत्री मार्सेलो लुईस एब्रार्ड कॅसौबोन यांनी गुरुवारी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या चर्चेदरम्यान हा प्रस्ताव मांडला. उझबेकिस्तानमधील समरकंद येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या 22व्या बैठकीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली आणि सध्या युद्धाची वेळ नाही, अशी ठाम भूमिका मांडली होती.

मोदींच्या सल्ल्याचं जगभरातून कौतुक
मोदींच्या वक्तव्याचे अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनसह पाश्चात्य देशांनी स्वागत केलं होतं. मेक्सिकोचे परराष्ट्र मंत्री म्हणाले की, "भारताच्या शांतता-प्रेमाच्या भूमिकेनुसार, मेक्सिकोचा विश्वास आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत" 

"मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांनी व्यक्त केलेला युक्रेन संवाद आणि शांतता समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव मी तुमच्यासमोर मांडत आहे. ज्यामध्ये संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्या मध्यस्थी प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी इतर राष्ट्रप्रमुख आणि सरकारांच्या सहभागाने एक युक्रेन संवाद आणि शांतता समिती स्थापन केली जावी. ज्यामध्ये शक्य असल्यास भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोप फ्रान्सिस यांचा समावेश करावा", असं मेस्किकोचे परराष्ट्र मंत्री मार्सेलो म्हणाले. 

कायमस्वरुपी शांततेसाठी समितीची गरज
शांतता समितीचे उद्दिष्ट संवादासाठी एक नवीन यंत्रणा आणि विश्वास निर्माण करण्यासाठी मध्यस्थीसाठी योग्य जागा तयार करणं, दोन्ही देशांमधील तणाव कमी करणं आणि कायमस्वरुपी शांततेचा मार्ग खुला करणे हे असेल. युक्रेन आणि रशियामध्ये गेल्या ७ महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. आता तर रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 300,000 राखीव सैनिकांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमधील परिस्थितीती अद्याप सुधारलेली नाही. अशा पार्श्वभूमीवर जगातील इतर देशांनी पुढाकार घ्यायला हवा, असंही मेक्सिकोनं नमूद केलं आहे. 

Web Title: mexico proposes un to set up a committee with pm narendra modi and other global leaders to bring peace between russia and ukraine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.