विएस्का, मेक्सिको- उत्तर मेक्सिकोतील वाळवंटात एका जागी एक मोठा प्रकल्प आकारास येत आहे. सौरऊर्जेचा वापर करुन वीज निर्मिती करणारा एक प्रकल्प येथए आकारास येत आहे. मेक्सिकोतील मोठा सौरऊर्जा प्रकल्प म्हणून हा प्रकल्प ओळखला जाईल.मेक्सिकोतील कोहुलिया येथे हा प्रकल्प उभारला जात आहे.
फूटबॉलच्या 2200 मैदानांच्या एकत्रित आकाराइतक्या मोठ्या क्षेत्रावर सोलर पॅनल्स उभे केले जात आहेत. या प्रकल्पात एकूण 2 लाख सोलर पॅनल्स वापरले जाणार असून त्यापासून निर्माण होणारी वीज 13 लाख घरांना पुरवली जाणार आहे. आकाराचा विचार केल्यास चीन आणि भारतातील सौर प्रकल्पांनंतर या प्रकल्पाचा नंबर लागेल. या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सूर्यफुले जशी सूर्याच्या दिशेनुसार वळतात तशी ही पॅनल्स आपली स्थिती बदलतील. 2024 पर्यंत मेक्सिकोच्या एकूण गरजेपैकी 35 टक्के वीज या प्रकल्पातून पुरवली जाईल.2050 पर्यंत जगातील सर्व देशांनी प्रदूषणामध्ये, व हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामध्ये निम्मी घट करावी असे लक्ष्य संयुक्त राष्ट्राने ठेवले आहे. मेक्सिकोने याबाबतीत वेगाने प्रगती केली असून 2013 पासूनच ऊर्जा निर्मितीसाठी प्रदूषणरहित मार्गांचा वापर करण्याचे धोरण आखले होते. मेक्सिकोचे ऊर्जा मंत्री पेद्रो जोआकीन कोल्डवेल यांनी देशात 40 सोलरपार्क्स आणि 25 पवनऊर्जा प्रकल्प उभारण्याचा मानस व्यक्त केला आहे. 2015मध्ये मेक्सिकोमध्ये लहानमोठ्या आकाराचे 9 सोलरपार्क्स होते ते 20121 साली मेक्सिकोमध्ये एकूण 68 सोलरपार्क्स असतील.