चिल्पान्सिंगो (मेक्सिको) : मेक्सिकोतील टोळीने ४३ विद्यार्थ्यांची हत्या केल्याचे उघडकीस आल्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने अनेक वाहनांना आग लावली असून, सरकारी मुख्यालयावर बॉम्ब फेकले आहेत. चिल्पान्सिंगो येथील ग्युएरोरो सरकारच्या मुख्य कार्यालयावर दगडफेक करण्यात ३०० पेक्षा अधिक मुखवटे घातलेले विद्यार्थी सहभागी होते. या दगडफेकीत कार्यालयाच्या काचा फुटल्या आहेत. दगडफेक करणाऱ्या एका विद्यार्थ्याने आमचे कॉम्रेड आम्हाला जिवंत पाहायचे आहेत, असे सांगितले. २६ सप्टेंबर रोजी ग्युएरेरो शहरात पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या बसवर गोळीबार केला होता. त्यात ६ विद्यार्थी मरण पावले होते. बाकीचे ४३ विद्यार्थी या घटनेनंतर बेपत्ता झाले होते. अॅटर्नी जनरल जेसस म्युरीलो यांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना आपल्या ताब्यात दिल्याचे टोळीच्या तीन सदस्यांनी मान्य केले आहे. या मुलांची हत्या करून त्यांना जाळून टाकण्यात आल्याची चित्रफीत जारी करण्यात आली आहे; पण मुलांचे पालक व सहविद्यार्थी त्यांचा मृत्यू झाला हे मान्य करण्यास तयार नाहीत. जोपर्यंत मृतदेहांच्या अवशेषांची डीएनए चाचणी होत नाही, तोपर्यंत कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवणार नाही, असे आंदोलनातील लोकांचे म्हणणे आहे.
४३ विद्यार्थ्यांच्या हत्येनंतर मेक्सिकोत आंदोलन...!
By admin | Published: November 10, 2014 3:20 AM