ऑनलाइन लोकमत
मेक्सिको सिटी, दि. 09 - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाच देशांचा परदेशी दौरा यशस्वी ठरला असून सर्वात महत्वाचं म्हणजे मेक्सिकोने अण्वस्त्र पुरवठादार गट अर्थात न्यूक्लियर सप्लायर्स ग्रुप (NSG) राष्ट्र समूहाच्या सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा दिला आहे. स्वित्झर्लंडनंतर मेक्सिकोनेही भारताला पाठिंबा दिल्याने भारताचा दावा बळकट झाला आहे. याअगोदर अमेरिकेनेही भारताला पाठिंबा दिला आहे. याचा परिणाम भारताला विरोध करणा-या चीनवर झाला असून तो एकाकी पडला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या दौ-यावर असून अंतिम टप्पा मेक्सिकोमध्ये होता. यावेळी पंतप्रधान मोदींनी मेक्सिकोचे अध्यक्ष एनरिक पेना नीटो यांची भेट घेतली. तसंच भारताच्या एनएसजी सदस्यत्वाला पाठिंबा दिल्याबद्दल मोदींनी नीटो यांचे आभारही मानले.
यानंतर नरेंद्र मोदी आणि एनरिक नीटो यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. मोदींनी मेक्सिकोसोबत माहिती तंत्रज्ञान, औषध उद्योग आणि ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये व्यापार आणि गुतंवणुकीवर भर दिला. त्याशिवाय त्यांनी अंतराळ, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही गुंतवणुकीची आशा व्यक्त केली.
मोदींसाठी एनरिक पेना ड्रायव्हिंग सीटवर -
एनएसजी पाठिंब्यानंतर मेक्सोकाचे राष्ट्राध्यक्ष एनरिक पेना नीटो यांनी प्रोटोकॉल तोडत मोदींसाठी स्वत: ड्रायव्हिंग केलं. मोदींसाठी हॉटेलमध्ये विशेष जेवणाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नीटो यांनी स्वत: गाडी चालवत मोदींना हॉटेलपर्यंत घेऊन गेले.
एनएसजी सदस्यत्वासाठी भारताचा अर्ज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ४ जूनपासून प्रारंभ होणाऱ्या अमेरिका दौऱ्याच्या पूर्वी भारताने अणू पुरवठा गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळण्यासाठी औपचारिक अर्ज दाखल केला होता. पाकिस्तानने आपला अर्ज पाठविण्याच्या आठवडाआधी म्हणजे १२ मे रोजीच भारत सरकारने आपला अर्ज दाखल केला होता. ९ आणि १० जून रोजी व्हिएन्ना येथे बंदद्वार बैठकीत या अर्जांचा विचार केला जाणार आहे. भारताला एनएसजीचे सदस्यत्व मिळावे यासाठी पंतप्रधान मोदी हे स्वत: या ४८ सदस्यीय जागतिक संस्थेचे सदस्य असलेल्या जगभरातील राष्ट्रप्रमुखांना वारंवार फोन करून भारताची बाजू मांडत आले आहेत.
Standing together. PM and President @EPN sign copies of their joint photograph pic.twitter.com/XMCf9P7og2— Vikas Swarup (@MEAIndia) June 9, 2016
Bonding over bean tacos! President @EPN and PM @narendramodi share a meal pic.twitter.com/ckmsmpjWo7— Vikas Swarup (@MEAIndia) June 9, 2016