द हेग (नेदरलॅण्ड) : अनेक जोरकस वस्तू धडकल्यामुळे एमएच - १७ या मलेशियन विमानाचा आकाशातच स्फोट झाला होता, अशी माहिती युक्रेनच्या पूर्व भागात झालेल्या या भीषण दुर्घटनेवरील प्राथमिक अहवालामध्ये देण्यात आली आहे. या दुर्घटनेत २९८ जणांचा बळी गेला होता. नेदरलॅण्ड सुरक्षा मंडळाने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात म्हटले आहे की, बाहेरील बाजूने वेगवान वस्तूंच्या माऱ्यामुळे मलेशियन विमानाचे हवेतच तुकडे तुकडे झाले होते. अहवालाच्या निष्कर्षावरून मलेशियन विमानास क्षेपणास्त्राद्वारे लक्ष्य बनविण्यात आल्याच्या दाव्याला बळ मिळते. हे विमान जुलैमध्ये अॅमस्टरडॅम येथून क्वालालम्पूरला जात असताना युक्रेनच्या पूर्व भागात कोसळले होते. हे विमान तांत्रिक समस्या किंवा वैमानिकांच्या चुकीमुळे दुर्घटनाग्रस्त झाल्याचे कोणतेही संकेत मिळत नाहीत, असे या अहवालात म्हटले आहे. युक्रेन आणि पाश्चात्य देशांनी रशिया समर्थक बंडखोरांनी जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या बीयूके क्षेपणास्त्राद्वारे हे विमान पाडल्याचा आरोप केला होता. रशियाने बंडखोरांना ही क्षेपणास्त्रे पुरविली असल्याचाही त्यांचा आरोप होता, तर रशियाने हे आरोप फेटाळून लावत युक्रेन सरकारनेच हे विमान पाडले असल्याचा प्रत्यारोप केला होता. मलेशियन एअरलाईन्सचे विमान एमएच ३७० मार्चमध्ये गूढरीत्या बेपत्ता झाल्यानंतर एमएच १७ विमानाला झालेल्या अपघाताच्या रूपाने या एअरलाईन्सला दुसरा मोठा धक्का बसला होता, तसेच संपूर्ण जगाचे लक्ष पूर्व युक्रेनमधील रक्तरंजित संघर्षाकडे वेधले गेले होते. दुर्घटनाग्रस्त विमानातील बहुतांश प्रवासी नेदरलॅण्डचे नागरिक होते. (वृत्तसंस्था)
‘एमएच१७’वर धडकल्या होत्या अनेक जोरकस वस्तू
By admin | Published: September 10, 2014 5:55 AM