अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाल्यापासूनच अनेक देशांचे टेन्शन वाढले आहे. ट्रम्प यांचे पुढचे पाऊल काय असेल? ते त्यांच्या देशाविरुद्ध काही कारवाई तर करणार नाहीत ना? हेच त्यांना समजेनासे झाले आहे. खरे तर, काही देशांनी असा विचार करणे स्वाभाविकही आहे. हे समजण्यासाठी एक गोष्ट पुरेशी आहे, ती म्हणजे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे सदस्य मायकल वॉल्ट्ज यांना देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदाची (NSA) जबाबदारी स्वीकारण्यास सांगितले आहे.
मायकेल वॉल्ट्ज हे एक असे नाव आहे, जे ऐकूण पाकिस्तानलाही धडकी भरेल. वॉल्ट्झ हे 'आर्मी नॅशनल गार्ड'चे निवृत्त अधिकारी आणि माजी सैनिक आहेत. महत्वाचे म्हणजे, युक्रेनला शस्त्रास्त्रे उपलब्ध करून देण्याचे सध्याचे प्रयत्न आणि रशिया-उत्तर कोरिया यांच्यातील वाढती भागिदारी ते पश्चिम आशियामध्ये ईरानच्या प्रॉक्सी ग्रुप्सकडून सातत्याने होत असलेले हल्ले आणि इस्रायल-हमास-हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष थांबवण्यासाठीचा दबाव, अशा परिस्थितीत वॉल्ट्झ यांना NSA पद देण्यासंदर्भात विचार सुरू आहे.
पूर्व-मध्य फ्लोरिडातून तीन वेळा रिपब्लिकन काँग्रेसचे सदस्य बनलेले वॉल्टझ, हे गेल्या आठवड्यात अमेरिकन संसदेत पुन्हा निवडून आलेले यूएस सेन्यातील पहिले माजी सदस्य आहेत. ते ट्रम्प यांचे कट्टर समर्थक आहेत. चीनबद्दल त्यांची भूमिका कठोर असल्याचे मानले. याशिवाय, ते पाकिस्तान विरोधातही आघाडीवर असतात. महत्वाचे म्हणजे, ते अमेरिकन संसदेत भारताच्या बाजूने आवाज उठवण्यासाठीही ओळखले जातात. त्यांनी पेंटागॉनमध्ये धोरणात्मक विषयाचे सल्लागार म्हणूनही काम केले आहे.