वॉशिंग्टन: अमेरिकेतील सार्वत्रिक निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळे देशातलं राजकीय वातावरण तापू लागलं आहे. सोमवारी डेमोक्रॅटिक कन्व्हेंशनची सुरुवात झाली. यामध्ये माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल यांनी विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून अयोग्य असल्याचं ओबामा म्हणाल्या. डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदासाठी सक्षम नाहीत. त्यांच्या मनात कोणाबद्दलही सहानुभूती नाही. आम्ही ज्यावेळी नेतृत्व, सहानभुती आणि स्थिरतेच्या आशेनं व्हाईट हाऊसकडे पाहतो, त्यावेळी आम्हाला विभाजन, अराजकता आणि सहानुभूतीचा अभाव दिसतो, अशा शब्दांत मिशेल यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना लक्ष्य केलं. ट्रम्प यांची निवड देशासाठी चुकीची असल्याचं त्यांनी म्हटलं.अमेरिकेत ३ नोव्हेंबरला सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. यासाठी डेमोक्रॅटिक पक्षानं जो बिडेन यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. जो बिडेन बराक ओबामा अध्यक्षपदी असताना उपाध्यक्ष होते. यंदाच्या निवडणुकीत ते ट्रम्प यांना टक्कर देत आहेत. तर भारतीय-आफ्रिकी वंशाच्या कमला हॅरिस उपाध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. कमला हॅरिस कॅलिफॉर्नियाच्या खासदार आहेत.
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेसाठी अयोग्य अध्यक्ष; मिशेल ओबामांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 11:01 AM