जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. याच दरम्यान मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या बिल गेट्स (Bill Gates) यांनी कोरोनाबाबत भीती व्यक्त केली असून गंभीर इशारा दिला आहे. जगाने अद्याप कोरोना महामारीच्या सर्वात वाईट टप्प्याला तोंड दिलेले नाही असं म्हटलं आहे. तसेच अद्याप सरासरीच्या पाच टक्क्यांपेक्षा जास्त धोक्याचा सामना केलेला नाही असंही सांगितलं.
बिल गेट्स यांनी गंभीर इशारा दिला आहे की अधिक संसर्गजन्य आणि अधिक प्राणघातक कोरोना व्हेरिएंट येण्याचा धोका आहे. साथीच्या रोगाचा सर्वात वाईट टप्पा अजून पाहायचा आहे. याआधी देखील त्यांनी इशारा दिला आहे. डिसेंबर 2021 मध्येही बिल गेट्स यांनी कोरोना महामारीचा सर्वात वाईट टप्पा अद्याप संपलेला नाही. ते म्हणाले की, 2015 साली मी इशारा दिला होता की जग अजून पुढच्या महामारीसाठी तयार नाही. फायनान्शिअल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बिल गेट्स यांनी आपण अजूनही या साथीच्या धोक्यात आहोत असं म्हटलं होतं.
बिल गेट्स म्हणाले की, त्यांना जगाला घाबरवायचे नाही पण आतापर्यंत आपण कोरोनाच्या सर्वात वाईट टप्प्याचा सामना केलेला नाही. कोरोना महामारीमुळे मार्च 2020 पासून जगभरात सुमारे 62 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. अलीकडच्या दिवसांत एकूण प्रकरणे आणि मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. यापूर्वी, डब्ल्यूएचओ प्रमुखांनी इशारा दिला होता की लोकांना अद्याप व्हायरसबद्दल काळजी करण्याची गरज आहे. अनेक देशांमध्ये चाचणीमध्ये घट झाली आहे, त्यामुळे व्हायरस पुन्हा उद्भवण्याचा धोका आहे असंही म्हटलं आहे.
जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने 51 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या 513,665,996 वर पोहोचली आहे. तब्बल 6,262,066 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. भारत सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. रुग्णांच्या संख्येने चार कोटींचा टप्पा पार केला असून आतापर्यंत पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,157 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ आता समोर आला आहे. एका आठवड्यात रुग्णसंख्येत तब्बल 41 टक्क्यांची वाढ झाली आहे.