वॉशिंग्टन: आयटी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेलांच्या वेतनात तब्बल 66 टक्क्यांची वाढ झाली आहे. नडेला यांना 2019 मध्ये 300 कोटी रुपये वेतन मिळालं आहे. यामध्ये बहुतांश वेतन कंपनीच्या समभागांच्या स्वरुपात आहे. मायक्रोसॉफ्टनं प्रसिद्ध केलेल्या वार्षिक परिपत्रकातून नाडेलांच्या वेतनाबद्दलची माहिती समोर आली. सत्या नाडेला यांच्या नेतृत्त्वाखाली मायक्रोसॉफ्टनं अपेक्षित उद्दिष्ट गाठली. याशिवाय कंपनीच्या समभागांच्या दरांमध्येदेखील मोठी वाढ झाली. त्याचं बक्षीस म्हणून नाडेलांच्या वेतनात तब्बल 66 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. नाडेला यांना वेतनातील बराचसा भाग समभागांच्या स्वरुपात मिळतो. नाडेला यांचं एकूण वेतन 4.29 कोटी डॉलर आहे. त्यापैकी 2.96 कोटी डॉलर त्यांना समभागांच्या रुपात मिळतात. तर 1.07 कोटी डॉलर इतकी रक्कम प्रोत्साहन योजनेतून मिळते. या व्यतिरिक्त 1,11,000 डॉलर त्यांना अन्य गोष्टींमधून मिळतात.1967 मध्ये हैदराबाद इथं जन्मलेल्या सत्या नाडेलांनी 2014 मध्ये मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारली. स्टिव्ह बाल्मर यांच्याकडून त्यांनी कंपनीची सूत्रं हाती घेतली. 2017-18 मध्ये त्यांना 2.58 कोटी डॉलर इतकं वेतन मिळालं होतं. नाडेलांच्या नेतृत्त्वाखाली मायक्रोसॉफ्टनं अनेक क्षेत्रांमध्ये दमदार वाटचाल केली आहे. क्लाऊड कॉम्प्युटिंग क्षेत्रात मायक्रोसॉफ्ट घेतलेली भरारी हे नाडेला यांचं मोठं यश मानलं जातं.
वेतनात तब्बल 66 टक्क्यांची वाढ; सत्या नाडेलांचा पगार पाहून चक्रावून जाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 10:25 PM