सान जोस : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी माहिती-तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध सिलिकॉन व्हॅलीला भेट देत आयटी दिग्गजांशी (टेक टायटनशी) संवाद साधल्याची पाच फलश्रुती पाच महत्त्वपूर्ण घोषणांमध्ये झाली आहे. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्य नडेला यांनी भारतातील पाच लाख गावांना ब्रॉडबॅन्ड कनेक्टिव्हिटी तर गुगलने ५०० रेल्वेस्थानकांवर मोफत वायफाय सुविधा देण्यासाठी केंद्र स्थापन करणार असल्याचे जाहीर केले आहे.सान जोस येथे बोलताना मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला यांनी कमी किमतीतील ब्रॉडबॅन्ड तंत्रज्ञान भारतातील पाच लाख गावांपर्यंत पोहोचविण्याची मनीषा व्यक्त करीत ‘डिजिटल इंडिया’त सहभागासाठी उत्सुक असल्याचे स्पष्ट केले. कमी खर्चाचा ब्रॉडबॅन्ड संपर्क आणि क्लाऊड कम्प्युटिंगच्या साह्याने कामकाजात सृजनात्मकता, दक्षता आणि उत्पादकता वाढविण्यात मोलाचे योगदान देता येईल. त्यामुळे संपूर्ण भारतात योग्य दरात उत्पादन आणि सेवा सुनिश्चित करता येतील. आमची कंपनी भारतातील डाटा सेंटरच्या माध्यमातून क्लाऊड सेवा उपलब्ध करण्याची घोषणा करणार असून ती मोठी उपलब्धी ठरेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.भारतात उत्पादन केंद्र स्थापन करण्याचे निमंत्रण दिले असता अॅप्पलचे सीईओ टीम कूक यांनी मोदींना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अॅप्पलच्या फॉक्सकॉन या सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीने भारतात प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी पत्रकारांना सांगितले. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी डिजिटल साक्षरतेला गती देताना पुढील महिन्यापासून भारतात गुजरातीसह १० वेगवेगळ्या भाषांमधून टाईप करण्याची सुविधा उपलब्ध करवून देणार असल्याचे स्पष्ट केले.(वृत्तसंस्था)
मायक्रोसॉफ्ट, गुगल इंडियाचा मदतीचा हात
By admin | Published: September 28, 2015 2:08 AM