हमासच्या दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांचा शोध सुरू आहे. इस्रायली सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायली सैनिकांना गाझामधील सर्वात मोठ्या रुग्णालयाजवळ ओलीस ठेवलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. लष्कराने गुरुवारी ही माहिती दिली. येहुदित वेस असं मृत महिलेचं नाव आहे. इस्रायली सैन्याच्या म्हणण्यानुसार, युद्धग्रस्त पॅलेस्टिनी प्रदेशात दहशतवाद्यांनी तिची हत्या केली.
"गाझा पट्टीमध्ये येहुदितला दहशतवाद्यांनी ठार केलं आणि आम्ही वेळीच तिच्यापर्यंत पोहोचण्यात अयशस्वी ठरलो" असं डॅनियल हगारी यांनी म्हटलं आहे. ओलीस ठेवलेल्या व्यक्तीच्या मृत्यूसाठी हमासने इस्रायललाच जबाबदार धरलं आहे. हमासचं म्हणणं आहे की, गाझा पट्टीवर सतत बॉम्बहल्ला केल्यामुळे इस्रायली ओलीस मरत आहेत.
हमासच्या हल्ल्यांदरम्यान जवळपास 240 लोकांना ओलीस ठेवण्यात आलं होतं. सुमारे 1,200 लोक मारले गेले होते ज्यातील बहुतेक नागरिक आहेत असं इस्रायली अधिकार्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे हमासच्या सरकारी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, इस्रायली बॉम्बहल्ल्यात 11,500 हून अधिक लोक मारले गेले आहेत, नागरिक आणि हजारो मुलांचा यामध्ये समावेश आहे.
इस्रायली विशेष सैन्याने बुधवारी पहाटे अल-शिफा रुग्णालयावर हल्ला करण्यास सुरुवात केली, एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना कम्पुटरवर ओलीस ठेवलेल्या लोकांशी संबंधित फुटेज सापडलं आहे. हमासचं म्हणणं आहे की, या ऑपरेशनमुळे हॉस्पिटलचं गंभीर नुकसान झाले आहे. युद्धामुळे अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.