जगभरात कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांच्या संख्येने तब्बल 4 कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मोठ्या प्रमाणात संशोधन करण्यात येत असून अनेक ठिकाणी चाचण्यांना यश आलं आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये एका कंपनीने कोरोनावर लस तयार केली आहे. या लसीबद्दल लोकांमध्ये भीती आणि गैरसमज असल्याने ती भीती घालवण्यासाठी UAEचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनीच ही लस घेतली आहे.
शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. तसेच कोरोना लस घेतानाचा एक फोटो देखील ट्विट केला आहे. तसेच आपल्या मंत्रिमंडळातल्या अनेक सहकाऱ्यांनीही ही लस घेतल्याची माहिती त्यांनी दिली. UAE मधल्या अधिकारी आणि डॉक्टरांनी या लसीसाठी अतिशय मेहनत घेतली आहे असंही त्यांनी सांगितलं. सर्वांच्या सुरक्षिततेची आणि उत्तम आरोग्याची काळजी घेतली आहे.
देशातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून या लसीच्या वापराला आणीबाणीच्या परिस्थितीत परवानगी देण्यात आल्याचं शेख मोहम्मद यांनी सांगितलं आहे. देशातल्या नागरिकांचं आरोग्य उत्तम कसं राहिलं याची आम्ही काळजी घेत असल्याचं देखील म्हटलं. यूएईमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 1 लाख 36 हजार 149 रुग्ण आढळून आले आहेत. तर 503 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकांवर सध्या उपचार सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
लक्षणं असो वा नसो शहरातील सर्वांचीच होणार कोरोना टेस्ट; "या" देशाने घेतला मोठा निर्णय
कोरोनाची लक्षणं असो वा नसो शहरातील सर्वांचीच आता कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येनंतर ब्रिटनने मोठा निर्णय घेतला आहे. लिव्हरपूलमध्ये सर्वच नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात येणार आहेत. व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नसली तरी त्याची चाचणी होणार आहे. लिव्हरपूल शहरात सर्वांची चाचणी घेण्याचा निर्णय हा सध्या प्रायोगिक तत्वावर घेण्यात आला आहे. या प्रयोगात यश मिळाल्यास देशातील इतर ठिकाणीही सर्वांचीच चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची सातत्याने वाढणारी संख्या लक्षात घेऊन ब्रिटन सरकारने गुरुवारपासून एक महिन्यांसाठी लॉकडाऊन सुरू करण्याची घोषणा केली आहे.
लिव्हरपूलमध्ये सर्वांचीच चाचणी घेण्यात येणार
कोरोना टेस्ट दरम्यान लिव्हरपूल शहरात गोंधळ होऊ नये अथवा विरोध होऊ नये यासाठी लष्करालाही पाचारण करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नवीन प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या सुरू असलेली स्वॅब टेस्ट आणि न्यलॅट्रल फ्लोद्वारे लिव्हरपूलमधील नागरीक आणि कामगारांची टेस्ट करण्यात येणार आहे. या टेस्टचे निकाल एका तासात समोर येणार आहेत. लिव्हरपूलमध्ये सर्वांचीच चाचणी घेण्यात येणार असल्यामुळे त्यादृष्टीने सर्वच तयारी करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणावर चाचणी कशी केली जावी आणि वेगवान पद्धतीने चाचणी कशी होईल हे देखील समजणार आहे.