मुंबई - लॉकडाऊनमुळे अनेक मजूरांच्या स्थलांतराचा प्रश्न निर्माण झाला आहे. हाताला काम नसल्यानं उपासमारीनं मरण्यापेक्षा गावी जाण्याचा पर्याय अनेक मजूरांनी निवडला. त्यामुळे जमेल तसे आणि मिळेल त्या वाटेनं हे मजूर आपापल्या गावी परतण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियावर अशा मजूरांचे रोज फोटो पाहायला मिळत आहेत. यातीलच एका फोटोवरुन करण्यात आलेली बातमी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्या इंवांका ट्रम्प यांनाही भावली आहे. इवांका यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबद्दल मत व्यक्त केलं आहे.
सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक फोटो सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला होता. 15 वर्षांची मुलगी आपल्या आजारी वडिलांना सायकलवरून घरी घेऊन जात असल्याचा हा फोटो होता. ज्योती कुमारी असं या 15 वर्षीय मुलीचं नाव असून तिने आपले वडील मोहन पासवान यांना घेऊन सायकलवरून 7 दिवस तब्बल 1200 किलोमीटरचा प्रवास केला. तिने वडिलांना सायकलवर डबलसीट घेऊन गुरुग्राम ते बिहार असा प्रवास केला. ज्योतीचे वडील ही गुरुग्राममध्ये ई-रिक्षा चालवायचे. मात्र त्याचा अपघात झाला आणि ते जखमी झाले. लॉकडाऊनमध्ये पैसे संपले तसेच घर मालकानंही घर खाली करण्यासाठी दबाव आणला. त्यामुळे तिने सायकलने प्रवास करायचा असं ठरवलं. ज्योतीने आपल्या आजारी वडिलांना घेऊन बिहारला जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने एक सायकल देखील खरेदी केली. आजारी वडिलांना घेऊन तिने गुरुग्राममधून सायकलने आपला प्रवास सुरू केला आणि सात दिवसांनी ते त्यांच्या घरी सुखरुप पोहोचले. आजारी वडिलांसाठी श्रावण बाळ बनलेल्या ज्योतीचं आयुष्य त्या प्रसंगानं बदललं. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ओंकार सिंग यांनी ज्योतीला सिलेक्शन ट्रायलसाठी बोलावलं आहे. ज्योती आठवीत आहे आणि तिनं हे ट्रायल पास केल्यास तिची राष्ट्रीय सायकलिंग अकादमीत सराव करण्यास निवड होणार, असल्याचे सिंग यांनी सांगितले.
सायकलसवारी करणाऱ्या ज्योतीची दखल थेट इवांका ट्रम्प यांनी घेतली असून ज्योतीचं कौतुक करताना, भारतीय नागरिकांच्या सहनशक्ती व प्रेमाला त्यांनी पराक्रम म्हटलं आहे. तसेच, या प्रेम व सहनशक्तीच्या पराक्रमामुळे भारतीय नागरिक आणि सायकलिंग फेडरशनचं व्यापक बनल्याचंही इवांका यांनी म्हटलं आहे. इवांका यांनी ज्योतीच्या नावाचा उल्लेख करत भारताचं आणि भारतीय नागरिकांचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, सायकलिंग फेडरेशनच्या सिंग यांनी सांगितले की,''आमचं ज्योतीशी बोलणं झालं आणि लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर तिला पुढील महिन्यात आम्ही दिल्लीला बोलावणार आहोत. तिच्या प्रवासाचा, राहण्याचा आणि अन्य खर्च आम्हीच करणार आहोत. तिच्यासोबत घरातील कोणी व्यक्ती येत असेल, तर त्यांचाही खर्च आम्ही उचलू. त्यासाठी आम्ही बिहार राज्य सरकारशी चर्चा करत आहोत. 1200 किमी सायकल चालवणं सोपी गोष्ट नाही. तिच्याकडे ती ताकद आणि शारीरिक सहनशक्ती आहे. त्यामुळे तिची ट्रायल घेतली जाईल आणि तिनं 7-8 टप्पे जरी पार केले, तरी तिची निवड केली जाईल. त्यानंतर तिचा सर्व खर्च आम्ही करू, असेही सिंग यांनी सांगितले.