ब्युडापेस्ट : आॅस्ट्रिया आणि जर्मनीच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे ब्युडापेस्टच्या केलेटी स्थानकावर रोखल्यानंतर हंगेरी सरकारविरोधात सीरियन स्थलांतरितांनी निदर्शने तीव्र केल्या होत्या. आज एका रेल्वेने केलेटीमधील काही स्थलांतरितांना आॅस्ट्रियाच्या सीमेवरिल सोप्रोन गावापर्यंत जाण्याची संधी देण्यात आली. मात्र व्हिएन्ना आणि जर्मनीच्या दिशेने कोणतीही रेल्वे सोडण्यात आली नाही. स्थलांतरितांना आता कोणत्याही परिस्थितीत स्वीकारावे लागणारच हे मान्य केल्यामुळे युरोपियन युनियन त्यांना कसे सामावून घ्यायचे याची तयारी करु लागले आहे. ब्रुसेल्स बैठकीमध्ये त्यावर तोडगा काढला जाईल असे वाटते. राष्ट्राची एकूण संपत्ती व मूळ लोकसंख्या यांच्या आधारावर किती स्थलांतरित नागरिकांना प्रत्येक देशाने सामावून घ्यायचे याचा फॉर्म्युला तयार केला जाईल व त्यानुसार स्थलांतरित नागरिक स्वीकारले जातील. जमर्नी, फ्रान्स, इटली व ग्रीस यांनी यापुर्वीच स्थलांतरितांचे समान वाटप व्हावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे ब्रुसेल्स बैठकीनंतर या प्रश्नाने निर्माण झालेला ताण कमी होईल अशी अपेक्षा आहे.हंगेरियाचे पंतप्रधान व्हिक्टर ओर्बन स्पष्टवक्ते आणि फटकळ बोलण्यामुळे ते नेहमीच वादात राहिले आहेत. आताही स्थलांतरित लोकांबाबत सौम्य भूमिका घेणाऱ्या युरोपसंघाच्या आयुक्तांवर त्यांनी सरळ टीका केली आहे. जर्मनीचे प्रसिद्ध वर्तमानपत्र फॅ्रंकफर्ट अॅल्गेमेइन झायटुंगला मुलाखत देताना ते म्हणाले, आधीच युरोपच्या ख्रिश्चन धारणा व तत्वांना धरुन ठेवणे आवाक्याच्या बाहेर गेले आहे, त्यात स्थलांतरितांच्या लोंढ्यामुळे युरोपच्या ख्रिश्चन मुळावरच घाला येणार आहे. आता आपल्या डोळ््यासमोर जे काही चालले आहे त्याचे युरोपला भयावह परिणाम भोगावे लागणार आहेत असेही ते म्हणाले. ओर्बन यांनी युरोपियन संघाचे अध्यक्ष मार्टिन शुल्झ यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आज हंगेरीयन लोक घाबरले आहेत, युरोपचे सर्व नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत कारण या कठिण प्रसंगावर त्यांचे नेते ताबा मिळवू शकत नाहीत, हे त्यांना दिसत आहे, असे त्यांनी शुल्झ यांना सांगून टाकले.
हंगेरीतील स्थलांतराचा प्रश्न गंभीर
By admin | Published: September 03, 2015 10:42 PM