ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 20 - प्रेक्षकांचा लाडका अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमणने सातासमुद्रापलीकडे तिरंगा फडकविला आहे. पन्नास वर्ष ओलांडलेल्या सोमणने तीन दिवसांत 517 कि.मी. अंतराची मॅरेथॉन स्पर्धा पार केली आहे. फ्लोरिडात रंगलेली मॅरेथॉन स्पर्धा जगातील सर्वात कठीण समजली जाते. तिला अल्ट्रामॅन असेही म्हटले जाते. यामध्ये पोहणे, धावणे आणि सायकलिंग असे तीन टप्पे स्पर्धकाला पार करावे लागतात. तीन दिवस चालणाऱ्या अल्ट्रामॅन स्पर्धेत पहिल्या दिवशी 10 कि.मी. पोहणे आणि 142 कि.मी. सायकलिंग करणे, दुसऱ्या दिवशी 276 कि.मी. सायकलिंग तर तिसऱ्या दिवशी 84 कि.मी. धावावे लागते.मिलिंद सोमणच्या व्यतिरिक्त ४ भारतीयदेखील या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यांनीदेखील स्पर्धा पूर्ण केली आहे. अभिषेक मिश्रा, कौस्तुभ रडकर, पृथ्वीराज पाटील आणि मनमध रेबा अशी या भारतीयांची नावे आहेत. विशेष म्हणजे मिलिंदने ही मॅरेथॉन अनवाणी पूर्ण केली. स्पर्धा पूर्ण केल्यानंतर मिलिंदने, मी आनंदी असून भारतीय असल्याचा मला अभिमान आहे, असे त्याने म्हटले.
मिलिंद सोमणने तीन दिवसात पार केले 517 किमी अंतर
By admin | Published: February 20, 2017 10:25 PM