इस्लामाबाद : कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तानवर येत्या काळात मोठे संकट कोसळणार आहे. एकीकडे रुग्णांची वाढती संख्या आणि आरोग्य यंत्रणेची दुर्दशा झालेली असताना आता पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार असणार आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनाचे १२ हजारहून अधिक रुग्ण झाले आहेत. अशा संकटकाळात पाकिस्तानी लष्कराने खान यांना काहीसे बाजुला केले असून लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी ताबा घेतला आहे.
पाकिस्तानमध्ये कम्युनिटी संक्रमनाला सुरुवात झाली असून रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या सुरुवातीला कोरोनाचा मोठा उद्रेक होण्याची शक्यता आहे. डॉक्टर, नर्स आंदोलने करत आहेत. त्यांना पुरेशी वैद्यकीय उपकरणे, पीपीई किट मिळत नाहीत. यामुळे त्यांनी जर आम्हीच वाचलो नाही तर लोकांना कोण वाचवणार असा प्रश्न सरकारला विचारला आहे.
२२ मार्चला पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी देशात लॉकडाऊन करणार नसल्याचे सांगितले होते. यावेळी त्यांनी लोक कोरोनापेक्षा उपाशी राहूनच मरतील अशी भीती व्यक्त केली होती. मात्र, त्यांच्या या घोषणेला २४ तास उलटत नाहीत तोच पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ता मेजर जनरल बाबर इफ्तिकार यांनी लॉकडाऊनवर सेना विचार करत असल्याचे म्हणत काही काळाने घोषणा केली. फायनान्शिअल टाईम्सने हे वृत्त दिले आहे.
यानंतर पाकिस्तानभर लष्कराला तैनात करण्यात आले असून सरकारला यापासून लांब ठेवण्यात आले आहे. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी पाकिस्तानी लष्करच रणनीती बनवत आहे. लष्कराचे अधिकारी या कोरोनाच्या संकटाला एक संधी म्हणून पाहत आहेत. इम्रान खान देशाला सांभाळण्यासाठी सक्षम नाहीत आणि सेनाच लोकांना कोरोनापासून वाचवू शकते, असा डाव खेळला जात आहे.
पाकिस्तानच्या एका निवृत्त जनरलने सांगितले की, इम्रान सरकारने कोरोना व्हायरसशी लढण्याच्या रणनीतीमध्ये मोठी चूक केली आहे आणि सैन्य त्याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्याकडेही कोणता दुसरा पर्याय नाहीय. तर दुसरीकडे राजकीय तज्ज्ञांनी म्हटले की, यामागे लष्कराचा मोठा कट असून इम्रान खान यांना काश्मीर मुद्दा आणि कोरोनावरून अपयश आल्याचा ठपका ठेवत बाजुला केले जाऊ शकते. त्यातच इम्रान खान आणि ल्ष्करप्रमुख बाजवा यांच्यामध्ये खटके उडत असल्याचे वृत्त काही महिन्यांपूर्वी आले होते. तसेच एफटीएफच्या काळ्या यादीतून पाकिस्तानला बाहेर काढू न शकल्याचे खापरही खान यांच्यावर फोडण्यात येणार आहे.
आणखी वाचा...
Video "चार बायका, २६ मुले, त्यांना खायला कुठून आणू?" पाकिस्तानीची व्यथा
किम जोंग उनचा मृत्यू की ब्रेन डेड? उद्या मोठ्या घोषणेची शक्यता
किम जोंग उन काहीच नाही, त्याच्यापेक्षाही क्रूर आहे बहीण किम यो जोंग
...बस खिडकी थोडीशी उघडी ठेवा; कोरोनाला संपवण्यासाठी सरकारचे आवाहन