इस्लामाबाद : पाकिस्तानमधील नागरिकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. भाजीपाला, पेट्रोल, डिझेल यांच्या किंमती वाढल्यामुळे येथील जनता आधीच त्रासली आहे. त्यातच आता येथील दुधाच्या दरात सुद्धा वाढ झाल्यामुळे लोकांच्या समस्येत आणखी वाढ झाली आहे.
गेल्या महिन्यात पेट्रोलची किंमत 117.83 रुपये (पाकिस्तानी रुपया) प्रति लीटर तर डिझेलची किंमत 132.88 रुपये प्रति लीटरपर्यंत पोहोचली होती. तर दुधाच्या दरात 140 रुपये प्रति लीटर वाढ झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमतीपेक्षा दूध जास्त किंमतीत विकले जात आहे. पाकिस्तानध्ये आधीच दुधाची किंमत वाढली होती. त्यात मोहरममुळे आणखीच भर पडली आहे. देशातील सर्वात मोठे शहर म्हणून ओळख असलेल्या कराची आणि सिंध प्रातांत दुधाची किंमत प्रति लिटर 140 रुपये झाली आहे.
पाकिस्तानमधील वृत्तपत्र एक्स्प्रेस न्यूजच्या रिपोर्टनुसार, मोहरमच्या मुहूर्तावर 'डेअरी माफियां'नी दुधाच्या दरात वाढ केली जात आहे. डेअरी माफिया चढ्या दराने दुधाची विक्री करत असल्याने याचा फटका पाकिस्तानी नागरिकांना बसत आहे. मोहरमनिमित्त दुधापासून तयार करण्यात आलेली खीर आणि सरबत नागरिकांना वाटण्यात येते. यासाठी दुधाची मागणी वाढली होती. त्याचाच फायदा दूध विक्रेत्यांनी दरात वाढ करुन घेतला आहे.
दरम्यान, या महिन्यात पाकिस्तान सरकारने महागाईने त्रासलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अनुक्रमे 4.59 रुपये आणि 5.33 रुपयांची घट केली होती. मात्र, यानंतरही पेट्रोल-डिझेल अनुक्रमे 113.24 रुपये आणि 127.24 रुपये दराने विकले जात आहे. तर, पाकिस्तान सरकारने दुधाचे दर प्रतिलीटर 94 रुपये केले आहेत. तसेच, वाढीव दराने दूध विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. तरी सुद्धा येथील डेअरी माफिया वाढीव दराने दुधाची विक्री करत आहेत.