वॉशिंग्टन : कोरोना संसर्गामुळे त्या रुग्णांची वाढती संख्या व आरोग्यव्यवस्थेवर पडणारा ताण या गोष्टींमुळे जगभरातील रुग्णालयांतील डॉक्टरांनी अत्यावश्यक नसलेल्या शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत. या लांबणीवर टाकलेल्या अस्थिरोग शस्त्रक्रिया पार पाडण्यास आगामी ७ ते १६ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने यासंदर्भात केलेल्या अभ्यासातील निष्कर्षात म्हटले आहे.
अमेरिकेतील डॉक्टरांनी कोरोना साथीच्या काळात गुडघे, हिप प्रत्यारोपण, मणक्यातील दोष दूर करण्याच्या काही लाख शस्त्रक्रिया लांबणीवर टाकल्या आहेत. जर्नल आॅफ बोन अँँड जॉइंट सर्जरी या नियतकालिकामध्ये डॉ. अमित जैन यांनी या अभ्यासासंदर्भात एक लेख लिहिला आहे.
अमेरिकेत किती शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आल्या या आकडेवारीचा जैन व त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉक्टरांनी सखोल अभ्यास केला. पुढे ढकललेल्या शस्त्रक्रिया करण्यास जून महिन्यापासून प्रारंभ होण्याची शक्यता आहे. अमेरिकेसह सर्वच देशांत सध्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक नसलेल्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
आॅपरेशन थिएटर्स अग्रक्रमाने उपलब्ध व्हावीत
अस्थिरोग शस्त्रक्रियांसाठी अमेरिकेतील रुग्णालयांनी अग्रक्रमाने आॅपरेशन थिएटर्स उपलब्ध करून द्यावी, असे जर्नल आॅफ बोन अँँड जॉइंट सर्जरी या नियतकालिकातील लेखात म्हटले आहे. एखादा माणूस पडल्याने किंवा अपघात होऊन फ्रॅक्चर झाल्यास किंवा मणक्यामध्ये खूपच गंभीर समस्या उद्भवल्यास तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते. परंतु गुडघा, हिप आदींच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया रुग्णांच्या व डॉक्टरांच्या सोयीनुसारही केल्या जाऊ शकतात.