वॉशिंग्टनअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या पुस्तकात भारतीय उद्योगपतींवर निशाणा साधला आहे. भारतातील उद्योगपतींनी श्रीमंतीच्या थाटात मोठमोठ्या राजामहाराजांनाही मागे टाकलं आहे, तर दुसऱ्याबाजूला आजही लाखो लोक बेघर आहेत, असं रोखठोक विधान ओबामा यांनी केलं आहे.
बराक ओबामा यांचं 'ए प्रॉमिस्ड लँड' नावाचं पुस्तक नुकतच प्रकाशित झालं. या पुस्तकामध्ये ओबामा यांनी आपल्या राजकीय व सामाजिक जीवनातील आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत. ओबामा यांनी आपल्या पुस्तकात भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. पण त्याचवेळी भारतातील उद्योगपतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
भारतात लाखो लोक बेघर
पीटीआयच्या माहितीनुसार ओबामा यांनी आपल्या पुस्तकात भारतातील गरीबीवर भाष्य केलंय. 'भारतात लाखो लोक आजही अतिशय वाईट अवस्थेत राहत आहेत. दुष्काळग्रस्त गावांमध्ये लोक झोपड्यांमध्ये काटकसर करत जीवन जगत आहेत. पण त्याचवेळी भारतीय उद्योग क्षेत्रातील रथीमहारथी हे राजेमहाराज आणि मुघलांही लाजवतील अशा थाटात जगत आहेत', असं ओबामा यांनी म्हटलंय.
ओबामा यांनी पुस्तकात २००८ सालच्या निवडणूक प्रचारापासून ते पाकिस्तानात अलकायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा खात्मा केलेल्या अभियानापर्यंतची सर्व माहिती नमूद केली आहे. या पुस्तकाचे दोन भाग असून पहिला भाग मंगळवारी प्रकाशित करण्यात आला.
भारत दौऱ्यावेळी ओबामांना भेटण्यासाठी उद्योगपतींची रांग
बराक ओबामा २०१५ साली भारत दौऱ्यावर आले होते. तेव्हा ते अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष होते. यावेळी ओबामा यांना भेटण्यासाठी भारतातील उद्योगपतींची रांग लागली होती. या रांगेत रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचाही समावेश होता. उद्योगपती ओबामांना भेटण्यासाठी रांगेत उभे असल्याचा एक फोटो देखील त्यावेळी प्रचंड व्हायरल झाला होता.