ऑनलाइन लोकमत
रियाध, दि. 18- सौदी अरेबियामध्ये मिनी स्कर्ट घालून फिरणं एका तरूणीला चांगलंच महागात पडलं आहे. मिनी स्कर्ट घालून फिरल्यामुळे येथील पोलिसांनी तिला थेट अटक केली आहे. इस्लामिक ड्रेस कोडचं उल्लंघन केल्यामुळे तिला अटक करण्यात आल्याची माहिती आहे. या तरूणीला अटक केल्याने सोशल मीडियावर सौदी सरकारवर जोरदार टीका होत आहे.
"खुलूद" नावाची ही तरूणी मिनी स्कर्ट आणि क्रॉप टॉप घालून सौदीच्या रस्त्यावर फिरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सौदीच्या राजधानीपासून काही किलोमीटर दूर असणाऱ्या एका प्राचीन किल्ल्यावर ती क्रॉप टॉप आणि मिनी स्कर्ट घालून फिरत होती. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सौदीतील स्थानिकांनी त्या तरूणीच्या या वर्तनाला विरोध करायला सुरूवात केली.
मिनी स्कर्ट घालून फिरणाऱ्या त्या तरूणीचा व्हिडिओ सुरूवातील स्नॅपचॅटवर पोस्ट करण्यात आला होता. ती मुलगी सौदीतील ऑशेगर गावात असलेल्या एका किल्ल्यावर फिरत होती. हे गाव राजधानी रियाध पासून 200 किलोमीटर अंतरावर आहे. सौदी मीडियाने सोमवारी ही बातमी प्रसारीत केली होती. तरूणी फिरत असलेला गाव पाश्चिमात्य संस्कृतीच्या विरोधात असून तेथे पारंपारिक पद्धती अजूनही वापरल्या जातात. सौदी प्रशासनाने या तरूणीच्या विरोधात कारवाई करण्याचा इशारा दिला होता.
सौदीमध्ये हिजाब, आयबा परिधान करण्याची महिलांना सक्ती आहे. हे नियम मोडणाऱ्या महिलेला शिक्षा दिली जाते. इथे महिलांसाठी एक ड्रेसकोड निश्चित आहे. सौदीतील महिला लांब आणि ढीले तसंच पूर्ण शरीर झाकणारे कपडे घालतात. तसा नियमच करण्यात आला आहे.