तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतरचे अनेक फोटो तुम्ही पाहिले असतील. प्रत्येक फोटो काळीज पिळवटून टाकणारा आहे. आजूबाजूला मृतदेहांचे ढीग पडले आहेत. रुग्णालयांमध्ये मृतदेह ठेवायला जागा नाही. कोणाचे संपूर्ण कुटुंब हिरावले गेले, तर कोणाच्या घरातील कर्ती व्यक्ती. जगातील अनेक देशांनी बचावकर्ते पाठवले आहेत जे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. याच दरम्यान, अनेक चमत्कारही पाहायला मिळत आहेत. एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये 128 तास ढिगाऱ्याखाली राहिल्यानंतर दोन महिन्यांचं बाळ जिवंत बाहेर आलं आहे.
मुहम्मद बेराम नावाच्या युजरने @Muhamme02062811 या हँडलने हा फोटो सर्वप्रथम ट्विटरवर शेअर केला होता. बघता बघता तो जगभर व्हायरल झाला. मुलाचा हसरा चेहरा, निरागसता पाहून लोकांचे डोळे पाणावले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा या मुलाला बाहेर काढण्यात आले तेव्हा तिथे उपस्थित असलेले लोक रडू लागले. त्यांनी आनंदात टाळ्या वाजवल्या. देवाचे आभार मानले. इतके तास मृत्यूला सामोरे जाऊनही मुलाचा चेहरा किती गोंडस आहे, हे व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
एक दिवसापूर्वी शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ आतापर्यंत तब्बल सात लाख वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडीओ हजारो लोकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. लोक मुलावर खूप प्रेम दाखवत आहेत. त्याच्या आरोग्याबद्दल प्रश्न विचारत आहेत. अनेकांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नसल्याचे सांगण्यात येत आहेत. लोक त्याला जन्मजात फायटर म्हणत आहेत आणि बचाव पथकाचे आभार मानत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भूकंपानंतर ढिगाऱ्यात गाडलेल्या व्यक्तीला Whatsapp ने दिलं जीवदान; लोकेशन शेअर केलं अन्...
तुर्कीमध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांनी मदतीची विनंती करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केल्याची घटना समोर आली आहे. लोकेशन शेअर करून आपला जीव वाचवण्याचे आवाहन केले. त्यामुळे अनेकांचा शोध घेता आला आणि अनेकांचे प्राण वाचवण्यात बचाव कर्मचार्यांना यश आले. अशाच प्रकारे एका विद्यार्थ्याने Whatsapp चा वापर केला, त्यानंतर त्याला आणि त्याच्या आईला वाचवण्यात यश आले आहे. बोरान कुबत असं या 20 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव असून त्याने Whatsapp व्हिडीओ अपीलमध्ये त्याचे लोकेशन शेअर केले होते, त्यानंतर तुर्कीमधील एका अपार्टमेंटच्या ढिगाऱ्याखालून त्याला वाचवण्यात यश आले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"