न्यूयॉर्क : अमेरिकी कंपनी मिराक कॅपिटलने सहाराचे विदेशातील तीन हॉटेल्स खरेदी करण्यासंबंधीचा सौदा अखेर रद्द केला आहे. २६.२५ लाख डॉलरचे शुल्कही मराकने परत केले आहे. सहाराची तिन्ही हॉटेल्स २.0५ अब्ज डॉलरांत खरेदी करण्याची मिराकची इच्छा असल्याचे सांगण्यात येत आहे.भारतीय वंशाचे सारांश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली मिराक कॅपिटल काम करते. सौदा रद्द केल्यानंतर कंपनीने म्हटले की, सहारा ही अनिच्छुक विक्रेता आहे. तिहार तुरुंगात असलेले सहाराचे प्रमुख सुब्रत राय यांची सुटका करण्यासाठी संकटमोचक म्हणून मिराक समोर आली होती. सहाराची विदेशातील तीन हॉटेल्स २0५ अब्ज डॉलरमध्ये खरेदी करण्याचा कंपनीचा सौदा ‘बनावट पत्रा’च्या वादात सापडला होता. मिराकने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २६.२५ लाख डॉलरचा सेबी सहारा निधी आम्ही परत पाठवून दिला आहे. सहाराला कर्ज देण्याचा प्रस्तावही कंपनीने समाप्त केला आहे. या कर्ज प्रस्तावानुसार, सहाराचे न्यूयॉर्क येथील द प्लाझा आणि ड्रीम डाऊनटाऊन आणि लंडनमधील ग्रोजवेनोर हाऊस ही तीन हॉटेल्स मिराक खरेदी करणार होती. या हॉटेलांवर बँक आॅफ चायनाचे कर्ज असून, तेही मिराककडे हस्तांतरित केले जाणार होते.या प्रकरणात मिराकचे १,0७५,000 डॉलर खर्च झाले आहेत. तरीही कंपनीने शुल्क परत केले आहे. सहाराची हॉटेल्स खरेदी करण्यासाठी मिराक अजूनही इच्छुक असल्याचे दिसते. मिराकने म्हटले की, हा सौद गतीने पूर्ण करण्यास मिराक इच्छुक आहे, तसेच सक्षमही आहे. आता भारताच्या सर्वोच्च न्यायालयानेच यात हस्तक्षेप करावा. (वृत्तसंस्था)
सहारासोबतचा सौदा मिराकने केला रद्द!
By admin | Published: February 12, 2015 12:44 AM