सिडनी : ऑस्ट्रेलियात हिंदूंच्या मंदिरांना लक्ष्य करण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. आता ब्रिस्बेन येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या भिंतींवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध उलटसुलट लिहिण्यात आले आहे.
हे कृत्य खलिस्तान समर्थकांचे असल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी २१ फेब्रुवारीच्या रात्री ब्रिस्बेनमधील भारतीय वकिलातीवर हल्ला झाला होता. गेल्या दोन महिन्यांत हिंदू मंदिरांना लक्ष्य केले जाण्याची ही चौथी घटना आहे. सर्वप्रथम १२ जानेवारीला मेलबर्न येथील बीएपीएस स्वामीनारायण मंदिराच्या भिंतींवरही भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. यानंतर १८ जानेवारीला मेलबर्नमधील श्री शिव-विष्णू मंदिराची तोडफोड झाली हाेती.(वृत्तसंस्था)
हिंदू समुदायाला सावध राहण्याची गरजसध्या घडत असलेल्या घटना पाहता हिंदू समुदायाला थोडे सावध राहावे लागेल. मेलबर्नमध्ये जे घडत आहे ते पाहता कॅनडा व अमेरिकेसारखी परिस्थिती इथेही होऊ शकते. त्यामुळे सरकारलाही सुरक्षेकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे, असे ऑस्ट्रेलिया असोसिएशन ऑफ आयुर्वेदचे अध्यक्ष डॉ. नवीन शुक्ला म्हणाले.
हिंदू हा ऑस्ट्रेलियातील तिसरा सर्वात मोठा धर्महिंदू धर्म हा ऑस्ट्रेलियातील तिसरा सर्वात मोठा धर्म आहे. सन २०२१ च्या जनगणनेनुसार ऑस्ट्रेलियात ६.८४ लाख हिंदू राहतात. हे प्रमाण तेथील लोकसंख्येच्या २.७ टक्के आहे. त्याचवेळी शीखांची संख्या सुमारे २.०९ लाख आहे.