टोकियो- जपानमधली सरकारी वाहिनी एनएचकेच्या कर्मचा-यानं चुकीचा संदेश पाठवल्यामुळे एकच गोंधळ उडाला. जपानच्या सरकारी वाहिनीच्या कर्मचा-यानं उत्तर कोरियानं जपानवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा संदेश पाठवला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. परंतु पुढच्या पाचव्या मिनिटाला एनएचकेनं नागरिकांची माफी मागितली आहे. खरं तर एनएचके या वृत्तवाहिनीला दुसरा संदेश पाठवायचा होता. परंतु अनवधानानं या वाहिनीनं जपानवर क्षेपणास्त्र हल्ला झाल्याचा संदेश पाठवला. यासंदर्भात एनएचके या वृत्तवाहिनीनं माफीसुद्धा मागितली आहे. या सर्व प्रकाराला यंत्रणा जबाबदार नसल्याचंही एनएचकेनं सांगितलं आहे. कर्मचा-याच्या नजरचुकीमुळे त्याच्याकडून हा संदेश पुढे गेल्याचं एनएचकेनं मान्य केलं आहे.मात्र याची अद्यापही सविस्तर माहिती प्राप्त झालेली नाही. याआधीसुद्धा हवाई आपत्कालीन अधिका-यांच्या चुकीमुळे जपानवर क्षेपणास्त्र हल्ला झाल्याचा संदेश फोनवरून पाठवण्यात आला होता. तर आता पुन्हा काही दिवसांनंतर जपानमध्ये हाच प्रकार घडला आहे. एनएचकेला धोक्याची सूचना मिळाल्यानंतर असे संदेश पाठवले जात असून, हा संदेशही एखाद्या अधिका-याच्या नजरेखालून गेल्यानंतरच प्रसारित करण्यात आला असावा, असं मत एनएचके प्रसारकानं मांडलं आहे.
क्षेपणास्त्र हल्ल्याच्या इशा-यानंतर अमेरिकेत खळबळक्षेपणास्त्राचा हल्ला होणार असल्याच्या चुकून दिल्या गेलेल्या इशा-याने अमेरिकेच्या हवाई बेटांवर भीतीचं वातावरण पसरलं होतं. स्थानिक वेळेनुसार, सकाळी 8.08 वाजता सर्व नागरिकांना मोबाईलवर एक आपत्कालीन अलर्ट आला. यात क्षेपणास्त्राचा हल्ला होणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. नागरिकांनी तत्काळ सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असेही निर्देश यात दिले होते. हा संदेश चुकीने गेला आणि त्यानंतर १० मिनिटात आपत्कालीन एजन्सीने ट्विट करत स्पष्ट केले की, असा कोणताही धोका नाही. अमेरिकेतील हवाई मार्गाच्या दिशेने बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा हल्ला होण्याची भीती आहे. त्यामुळे तातडीने सुरक्षित ठिकाणी आश्रयाला जा. ही कोणतीही ड्रील नाही,' असे त्यात मेसेजमध्ये म्हटले होते. मेसेजमध्ये ही कोणतीही ड्रील नसल्याचं लिहिण्यात आल्यामुळे नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली.